कल्याण : अंतिम वर्षाच्या परिक्षाबाबत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने युजीसीच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे परीक्षा घेण्याचा निकाल लागला. या निकालावर विद्यार्थी भारतीच्या कार्यकर्त्यांनी कल्याणच्या तहसीलदार ऑफिसला भेट देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र दिले. निर्णय जर सात दिवसात रद्द करण्याचा वटहुकूम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढला नाही, तर विद्यार्थी भारती तीव्र आंदोलन करेल, असे राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सांगितले.
विद्यार्थी भारतीकडून अनेक इमेल पाठवून, रक्ताच्या ठस्याचे पत्र पाठवून, ट्विट करून ,आंदोलने करून ,उपोषण करून, मोदींची पहाटे चार वाजता काकड आरती करून, भजन करून ,कीर्तन करून, यूजीसीची प्रेतयात्रा काढून, बोंबा मारो आंदोलन करूनही या सरकारने काहीही सकारात्मक प्रतिसाद न देता विद्यार्थ्यांच्या जीवावर टांगती तलवार ठेवली. वारंवार तारखांवर तारखाच दिल्या, असे म्हणणे धुरी यांनी मांडले. विद्यार्थी इतके दिवस एक आशेची भावना मनात ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत होते. ज्याची भीती होती, अखेर तेच झाले. अनेक विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले आईवडील गमावले आहेत. बेरोजगारीमुळे अन्न धान्याचाही तुटवडा आहे. अशावेळी विद्यार्थी कोणत्या मानसिकतेने परीक्षा देतील. हा साधा माणुसकीचा प्रश्न युजीसी ला का पडला नसावा, असे विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा मुधाने यांनी सांगितले.
मागील अनेक महिने विद्यार्थी भारती संघटना कोरोना काळात सर्वत्र महामारी पसरली असताना अंतिम सत्राच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना मृत्यूच्या सापळ्यात अडकवले जाऊ नये म्हणून प्राण पणाला लावून लढत आहे. यापुढेही लढणार असे विद्यार्थी भारती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी सांगितले.