ठाणे : आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागाने देखील महिला मतदारांची नोंदणी वाढविणे, मतदारांची अद्ययावत छायाचित्रे प्राप्त करून घेणे, तसेच दुबार मतदारांची नोंदणी वगळणे ही कामे युध्दपातळीवर हाती घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आज झालेल्या निवडणूक अधिकारी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर आढावा बैठकीत दिल्या.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन नवीन मतदार नोंदणी समवेत मतदार याद्यांमधल्या त्रुटी आणि दोष दूर करण्यावर भर देण्यात येणार आहे. ५९ लाख २७ हजार मतदार ठाणे जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीत एकूण ५९ लाख २७ हजार ७ इतकी मतदार नोंदणी असून त्यात ३२ लाख ४३ हजार ३३० इतके पुरुष आणि २६ लाख ८३ हजार ३४७ महिला व ३३० तृतीयपंथी आहेत. या यादीतील स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदार वगळणे आवश्यक आहे. महिलांचे नोंदणी प्रमाण ८२६ त्याचप्रमाणे जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ८८० महिला असे लिंग प्रमाण असून मतदार यादीत महिलांचे नोंदणी प्रमाण ८२६ इतके आहे. महिलांचे हे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.
१७ टक्के मतदारांची मतदारयादीत छायाचित्रे नाहीत जिल्ह्यातील ८३.८७ टक्के म्हणजे ४९ लाख ७१ हजार ५१ मतदारांचे छायाचित्र असून ९ लाख ५५ हजार ९५६ मतदारांचे छायाचित्र नाही. तसेच काही मतदारांची छायाचित्रे कृष्णधवल किंवा निवडणूक आयोगाच्या मानांकनानुसार नाहीत ती बदलणे आवश्यक आहे.
युवकांची मतदार नोंदणी वाढविण्यावर भरमतदार यादीत १८ ते २९ वयोगटातील मतदार नोंदणीचे प्रमाण कमी आहे तर ३० वर्षांवरील मतदारांचे प्रमाण जास्त आहे. युवकांची मतदार नोंदणी वाढविण्याची गरज आहे असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जे तरूण/तरूणी दि. 01.01.2018 व दि. 01.01.2019 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करतात त्या भावी मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे.
असे आहेत मतदार यादीतील दोषमतदार यादीतील डाटाबेस मध्ये मतदाराचे प्रथम नाव व आडनाव रिक्त असणे, चुकीची अक्षरे असणे, यादी भाग निरंक असणे, घर क्रमांक नसणे, वय १८ वर्षापेक्षा जास्त व १०० वर्षापेक्षा जास्त दर्शविलेले असणे, मतदारांच्या नातेसंबंधांमध्ये योग्य शब्द नसणे असे काही दोष या मोहिमेत काढण्यात आले आहेत. ज्या मतदारांना नवीन १० अंकी ओळखपत्र क्रमांकाऐवजी जुना १६ अंकी ओळखपत्र क्रमांक दिला आहे असे एकूण २ लाख ३ हजार ४३८ मतदार असून १ लाख १७ हजार ६६१ मतदारांच्या मतदार यादीत रंगीत छायाचित्रे आहेत त्यांना १० अंकी ओळखपत्र क्रमांक देऊन नवीन ओळखपत्र देणे शक्य आहे असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे.
मतदारांना आवाहनमतदारांना आवाहन करण्यात येत आहे की, युवकांचे/ महिला/ नवविवाहित महिला यांनी मतदार यादीतील त्रुटींची दूरूस्ती, नवीन फोटो देऊन PVC EPIC घेणेकामी खाली नमूद केलेला जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयातील हेल्पलाईन नं. व वेबसाईटवर संपर्क साधावा अथवा आपल्या नजीकच्या विधानसभा मतदार संघामध्ये संपर्क साधावा. ठाणे जिल्हयातील विधानसभा मतदार संघाची यादी सोबत जोडली आहे. संपर्कासाठी हेल्पलाईन नं. 02225344143, वेबसाईट - www.thaneelection.com