कल्याण : कल्याण परिसरात खड्ड्यांमुळे पाच जणांचे बळी गेले असताना मंगळवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी खड्ड्यांवर चर्चा करण्याएवजी गोंधळ घातला. त्यामुळे संवेदनशीलतेचे दर्शन घडले. चिखलात माखून आलेल्या अपक्ष नगरसेवकाने सुरुवातीला गोंधळ घातला. तर, सत्ताधारी भाजपाच्या उपमहापौर व नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर, मनसेच्या गटनेत्याने महापौरांसमोरील राजदंड पळविला. या प्रचंड गोंधळामुळे महापौरांनी सभा तहकूब केली. सत्ताधारी शिवसेना-भाजपाला खड्ड्यांच्या गंभीर मुद्यावर चर्चाच करायची नसल्याने त्यांनी नौटंकी करून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधी पक्ष मनसेने केला आहे.अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी हे चिखलात माखलेल्या अवस्थेत महासभेत आले. त्यामुळे शिवसेना सदस्यांनी त्यांना असे करू नका, असे समजावले. सुरक्षारक्षकांनीही त्यांना महासभेत जाण्यापासून मज्जाव केला. मात्र तानकी यांनी त्यांचा विरोध न जुमानता सभागृहात प्रवेश केला. सभागृहातही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांचे ऐकले नाही. खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीला लावून धरली. त्यावर सचिवांनी श्रद्धांजलीचे प्रस्ताव अनेकांनी मांडले आहेत, असे सांगितले. मात्र, त्यांचे काही एक ऐकून न घेता तानकी जोरात बोलत होते. महासभेने पाच मृतांना श्रद्धांजली वाहिली. सभेच्या सुरुवातीस भाजपा उपमहापौर उपेक्षा भोईर व अन्य सदस्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत ठिय्या धरला. त्यात तानकीही सहभागी झाले. तेव्हा हे आंदोलन करू नका जागेवर बसा असे, आदेश महापौर विनीता राणे यांनी दिले. मात्र, सभेत गदारोळ सुरू झाला.भोईर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमहापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी व दीपेश म्हात्रे यांनी केली. भाजपाचे स्थायी समिती सभापती राहुल दामले हे आंदोलनात सहभागी न होता मागे उभे होते. ‘स्थायी समिती सभापती काम करीत नाही. खड्डे बुजविले गेले नाहीत असाच या आंदोलनाचा अर्थ होतो. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाने करावी,’ असा उपरोधिक टोला शेट्टी यांनी लगावला. या गदारोळात मनसेचे गटनेते प्रकाश भोईर यांनी राजदंड पळवून बाहेर पळ काढला. दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या हातातील राजदंड पुन्हा आणून जागेवर ठेवला. महापौरांनी सभा तहकूब करत राष्ट्रगीत सुरू केले.>महापौरांचे कोणीच ऐकत नव्हतेमहापौरांचे कोणी ऐकतच नव्हते. त्यामुळे त्या राजदंडाचा काय उपयोग. त्यामुळे महापौरांसमोरील राजदंड पळविला. शिवसेना-भाजपाची नौटंकी रोखण्यासाठी हे कृत्य केले. हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करावी, असे आव्हानही मनसेचे गटनेते भोईर यांनी यांनी शिवसेनेला दिले आहे.कातडी वाचवण्याचा प्रयत्न?विरोधी पक्षनेते मंदार हळबे म्हणाले की, शिवसेना-भाजपला रस्त्यावरील खड्डे प्रश्नावर काडीमात्र गांभीर्य नाही. सभेतील गोंधळ थांबविण्यासाठी राष्ट्रगीताचा आयुधाचा वापर करून ते सुरू करत सभा संपविली. ही लोकशाहीची पायमल्ली आहे. खड्ड्यामुळे लोकांचे जीव गेले. त्यावर शिवसेना-भाजपा राजकारण करत आहे. त्यांनी कातडी वाचवण्याचा प्रयत्न यातून केला असला तरी पुढच्या सभेत विरोधी पक्ष त्यांना सोडणार नाही.>निलंबनाच्या चर्चेऐवजी बगलशिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर म्हणाले, भाजपा उपमहापौरांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याऐवजी ठिय्या दिला. भाजपाचे तीन आमदार व एक राज्यमंत्री असून जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आंदोलन केले. महासभेत भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा विषय होता. त्याला बगल देण्यासाठी भाजपाने हे आंदोलन मुद्दामून केले आहे. त्यामुळे भाजपाचा निषेध व्यक्त केला आहे.>आरोप तथ्यहीनउपमहापौर भोईर यांनी सांगितले की, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही ठिय्या दिला होता. त्यामुळे आमचा उद्देश प्रामाणिक होता. त्यात कोणतीही स्टंटबाजी नव्हती. त्यामुळे विरोधकांचा आरोपात काही तथ्य नाही.कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगळवारी ४८३ खड्ड्यांपैकी ३६९ खड्डे बुजविल्याची माहिती दिली आहे. हे खड्डे १६ किलोमीटरच्या अंतरात होेते. बुजविलेल्या खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ १६२९ चौरस मीटर इतके होते. काँक्रिट रस्त्यावरील १२५ चौरस मीटर खड्ड्यांची तर, आतापर्यंत चार दिवसात ३५ चेंबरची दुरुस्ती करण्यात आली आहे.
महासभेत असंवेदनशीलतेचे दर्शन, खड्ड्यांवर चर्चेऐवजी नौटंकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 3:56 AM