मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा कहर वाढत चाललेला असताना दुसरीकडे संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या नगरसेवकांच्या प्रभाग समिती निहाय दक्षता समित्या केवळ कागदांवर मिरवण्यापुरत्या राहिल्या आहेत. मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा कहर झपाट्याने वाढू लागला आहे . गुरुवार पर्यंत शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार ५९६ पर्यंत पोहचली आहे . तर ४६० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे . कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १२ हजार २५६ इतकी आहे . परंतु आता शहरात रोज दोनशे पेक्षा जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत . त्यामुळे चिंता वाढली आहे .
सर्व टप्प्याटप्प्याने अनलॉक होत असताना बाहेर पडणारे अनेक नागरिक, नगरसेवक , राजकारणी आदी मात्र मास्क न घालणे, घातल्यास नाकाच्या वा तोंडाच्या खाली ठेवणे , गर्दी करणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे आदी बेजबाबदार प्रकार सातत्याने करत आहेत . त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्यास हा बेजबाबदारपणा मुख्यत्वे कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ञां कडून सांगितले जात आहे . तर दुसरीकडे बहुतांश नगरसेवक, राजकारणी मात्र त्यांच्या त्यांच्या भागातील कोरोना निर्देशांचे होणारे उल्लंघन उघड्या डोळ्यांनी पहात स्वतःची जबाबदारी झटकत आहेत .
कोरोनाच्या संसर्ग काळात नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम केले जात नाही म्हणून राजकीय ओरड सुरु असल्याने पालिका आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी जुलै महिन्याच्या अखेरीस प्रभाग समिती निहाय ६ दक्षता समित्या स्थापन केल्या . या समितीला तब्बल २० मुद्द्यांवर काम करण्याची जबाबदारी आयुक्तांनी दिली . समिती मध्ये नगरसेवक , प्रभाग अधिकारी, पोलीस अधिकारी , स्वच्छता निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी व प्रभागातील कर्मचारी यांचा समावेश केला.
सदर दक्षता समितीने आठवड्यातून दोन वेळा बैठका घ्यायच्या. सोशल डिस्टंसिंग - मास्क वापर न करणाऱ्यांवर कारवाई करणे , थुंकणे वा कचरा - घाण करणाऱ्यांवर कारवाई करणे, प्रतिबंधित क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे हि कोरोना रोखण्याच्या अनुषंगाने महत्वाची जबाबदारी दिली. या शिवाय घरी आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची देखरेख व नियोजन करणे , खाजगी रुग्णालय व खाजगी लॅब जस्ट शुल्क आकारतात त्यावर नियंत्रण ठेवणे , जनजागृती करणे , वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजन करणे, प्रभागात १ हजार खाटांची व्यवस्था असेल इतके कोविड केअर व अलगीकरण केंद्र सर्व सुविधां सह तयार करणे आदी अनेक जबाबदाऱ्या या दक्षता समितीतील नगरसेवक , अधिकारी यांना आयुक्तांनी दिल्या.
नगरसेवकां सह पालिके कडून ग्राउंड लेव्हल वर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी काम व्हावे तसेच वेळीच कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार व्हावेत असे उद्देश होते . परंतु शहरात सर्रास कोरोना निर्देशांचे उल्लंघन होत असताना नगरसेवक तर आपल्या प्रभागा बाबत देखील कार्यवाही करण्या साठी मूग गिळून गप्प आहेत .
प्रत्यक्षात हे नगरसेवक व यांच्या दक्षता समित्या कुठेही सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन व मास्क वापर घालणे, थुंकणारे व कचरा - घाण करणारे तसेच प्रतिबंधित क्षेत्रात उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करताना दिसत नाही . अन्य जबाबदाऱ्यां बद्दल देखील नगरसेवकांची टोलवाटोलवी सुरु आहे . केवळ अँटीजेन टेस्ट , झाडांची छाटणी आदी अन्य साठी आवर्जून फोटो सेशन करताना अनेक नगरसेवक दिसतात . त्यामुळे नगरसेवकांच्या या दक्षता समित्या केवळ कागदावर मिरवण्या पुरत्या उरल्या आहेत . नगरसेवकांनाच कोरोना रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात स्वारस्य नसल्याने कोरोनाचा संसर्ग फोफावत चालला असून नागरिकांची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर आहे.
शानू गोहिल ( नगरसेविका ) - समिती मार्फत काहीच कार्यवाही होत नाही असे नाही आहे . परंतु मास्क घालणे , सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी कोरोना रोखण्यासाठीच्या अत्यावश्यक निर्देशांचे अधिक काटेकोर पालन केले गेले पाहिजे . उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे . दोन बैठका झाल्या पण त्यात काही नगरसेवकच दंड नको म्हणाले . पण पालिका , पोलीस प्रशासन कार्यवाही करत आहेत.
रोहित सुवर्णा ( सामाजिक कार्यकर्ता ) - अनेक नगरसेवक , राजकारणीच मास्क घालत नाहीत . एरव्ही नगरसेवक असल्याचा तोरा मिरवणारे हे कोरोना पसरू नये म्हणून प्रभागात प्रत्यक्ष जबाबदारीने कामे करत नाहीत . शहरात व पालिका मुख्यालयात देखील मास्क न घालता फिरणारे , गर्दी करणारे तसेच निर्देशांचे पालन न करणारे मोकाट सुटले आहेत . त्यावर नगरसेवक चिडीचूप आहेत . नगरसेवकांना केवळ फोटोसेशन , टेंडर , बेकायदेशीर बांधकामे व फेरीवाले आदीं मध्येच स्वारस्य आहे.