ठाणे : आमच्या या दोन्ही लेकरांचे मायबाप गेल्याने आम्ही दोघांचे पालनपोषण करायला तयार आहोत. एक मुलगा ११ तर एक मुलगा ३ वर्षांचा आहे. या वयात पण आम्ही त्यांना सांभाळू. फक्त आम्ही गेल्यानंतर त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, या लेकरांचे शिक्षण थांबता कामा नये, अशी भावनिक साद दोन्ही विहिणबाईंनी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना घातली. कोविडमुळे ७१ वर्षांच्या आजीने आपली सून तर ६५ वर्षांच्या आजीबाईने तिचा जावई गमावला. ठाकूर यांच्याशी बोलताना दोघींना अश्रू अनावर झाले होते.
कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या मुलांशी आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांशी सोमवारी ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संवाद साधला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या संवादाने ठाकूर गहिवरून गेल्या होत्या. मी या दोन मुलांसोबत आली आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे तो शासनाने सोडवावा, असा प्रश्न एका महिलेने विचारला तर मला पैशाची मदत नको पण मला नोकरी हवी आहे, अशी विनवणी एका १९ वर्षांच्या मुलीने केली. यावेळी तिचा बायोडेटा ठाकूर यांनी मागून घेतला. जी एक ते दोन वर्षांची मुले आहेत, त्यांची कागदपत्रे नाहीत अशांसाठी काय करता येईल?, दोन्ही मुलांची फी शाळा मागतेय त्या मुलांसाठी शासन सहकार्य करेल का? माझ्या आईवडिलांनी कर्ज काढले होते ज्यांच्याकडून कर्ज घेतले ते आता माझ्याकडे वारंवार विचारणा करीत आहेत. आमची विमा रक्कम मंजूर होत नाहीये, आईवडील गेल्यामुळे आम्हाला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले, मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यासाठी मदतीची गरज आहे, आईवडिलांचे पेन्शन आम्हाला मिळेल का? असे एक ना अनेक प्रश्न मुलांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी ठाकूर यांना विचारले. या सर्व प्रश्नांवर तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी दिला. तसेच, आई वडिलांच्या मालमत्ता मुलांच्या नावावर जाऊ शकते. हेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
पोरक्या बालकांसाठी या कॅबिनेटमध्ये निर्णय
प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रत्येकाला मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दोन चिमुकल्यांना पाहून ठाकूर निःशब्द झाल्या आणि त्यांच्या पाठीवर मायेचा हात ठेवून त्यांच्या नातेवाईकांना आम्ही सोबत आहोत. असा आत्मविश्वास दिला. यात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या बालकांसोबत राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कॅबिनेटमध्ये बाल संगोपनाबाबत काही निर्णय घेतले जातील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. एकाही मुलाला एकटे वाटणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असा आत्मविश्वासही त्यांनी दिला.