ठाणे : विजय इंदप क्रिकेट अकॅडमीने यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीचा सात विकेट्सनी पराभब करत तिसऱ्यांदा ३६ व्या डॉ श्रीधर देशपांडे स्मृती समरलीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.ओमकार करंदीकरची अचूक गोलंदाजी आणि स्वप्नील दळवीची दमदार फलंदाजी हे विजय इंदप क्रिकेट अकॅडमीच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
आज सेंट्रल मैदान येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा स्पोर्टींग क्लब कमिटीचा निर्णय फायदेशीर ठरला नाही. ओमकार करंदीकरची अचूक गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूने स्वप्नील दळवी आणि राहुल कश्यपने तेवढीच चांगली साथ दिल्याने यजमानांचा डाव १८.१ षटकात १०० धावांवर आटोपला. ओमकारने अवघ्या ५ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळवल्या तर स्वप्नील आणि राहुलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. यजमान संघाच्या यश जठारने २१ आणि तेजस चव्हाणने १५ धावा केल्या.
विजय इंदप क्रिकेट अकॅडमीने तीन फलंदाजांच्या मोबदल्यात १४.५ षटकात १०२ धावा करत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. स्वप्नील दळवीने फलंदाजितही आपली उपयुक्तता दाखवून देताना ४५ धावा केल्या. प्रणव यादवने नाबाद २१ धावा केल्या. स्पोर्टींग क्लब कमिटी संघाच्या कुणाल नवरंगेने दोन आणि यश जठारने एक विकेट मिळवली.
संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : १८.१ षटकात सर्वबाद १०० ( यश जठार २१, तेजस चव्हाण १५, कुणाल नवरंगे १२, ओमकार करंदीकर ४-५-३, स्वप्नील दळवी ३.१-१३-२, राहुल कश्यप ३-३६-२, अश्विन माळी ३-१२-१) पराभुत विरुद्ध विजय इंदप क्रिकेट अकॅडमी : १४.५ षटकात ३ बाद १०२ ( स्वप्नील दळवी ४५, ओमकार रहाटे १८, प्रणव यादव नाबाद २१, कुणाल नवरंगे ३.५.-२७-२, यश जठार ३-२०-१).