लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या सायबर रिल्स स्पर्धेत विकास गौतम ह्याने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले . सुप्रसिद्ध गायक व पदमश्री सोनू निगम यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले .
वाढत्या सायबर गुन्हयां बद्दल लोकां मध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सायबर रिल्स स्पर्धेचे आयोजन ४ नोव्हेम्बर ते ३१ डिसेम्बर ह्या कालावधीत करण्यात आले होते . ह्या स्पर्धा आयोजनासाठी मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी तसेच परिमंडाळातील अधिकारी यांनी पुढाकार घेतला होता . इंस्टाग्राम हा समाज माध्यमावर सायबर गुन्हयां बद्दल जनजागृतीपर रिल्स बनवण्यासाठी विविध स्तरातून नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
ह्या रिल्स स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मीरारोडच्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी पार पडला . ह्यावेळी सुप्रसिध्द पार्श्वगायक सोनु निगम, पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, आयुक्तालयाच्या मुख्यालयाचे उपायुक्त प्रकाश गायकवाड, परिमंडळ १ चे उपायुक्त जयंत बजबळे , परिमंडळ २ च्या उपायुक्त पौर्णिमा चौगुले, परिमंडळ ३ चे उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार , महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते .
ह्या रील स्पर्धेत प्रथम पारितोषिक विकास गौतम यांना देण्यात आले . त्यांना २१ हजार रोख , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सोनू निगम यांच्या हस्ते देण्यात आले . या शिवाय द्वितीय पारितोषिक विजेते साहील दळवी यांना १५ हजार व तृतीय पारितोषिक विजेतेभारत सिंग यांना ११ हजार रुपये देण्यात आले . उत्तेजनार्थ पहिले पारितोषिक वेदांत चासकर यांना , दुसरे उत्तेजनार्थ यश संघनी तर तिसरे उत्तेजनार्थ सनी रावल यांना प्रत्येकी ५ हजार रुपये बक्षीस दिले गेले . सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सुद्धा सोनू निगम यांच्या हस्ते दिले गेले .
यावेळी विरारच्या सेंट जोसेफ व विवा महाविद्यालय आणि वसईच्या सहयाद्री महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हे जनजागृतीच्या अनुशंगाने पथनाट्य सादर केले. तर विरारच्या चांदीप येथील बापुजी जाधव महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी तारपा नृत्य व पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री प्रधान- दामले यांनी केले. स्पर्धा पार पाडण्यासाठी धिरज मिश्रा यांनी चांगले सहकार्य केल्याने त्यांचा देखील सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमा दरम्यान काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल सायबर गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेली २३ लाख १३ हजार रुपयांची रक्कम फसवणूक झालेल्या फिर्यादीस परत करण्यात आली .