विक्रमगड नव्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची धूम सर्वत्र सुरु झाली असून नाक्यावर, गल्लीबोळात सध्या नगरपंचायत निवडणुकीचेच वारे वाहतांना दिसत आहेत़ ही निवडणूक येत्या २७ नोव्हेंबर रोजी होत असून नविन १७ प्रभागात ७७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी चार जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडल्या असल्याने १३ जागां भाजपा लढवित आहे. निलेश सांबरे प्रणीत विकास आघाडी तयार करण्यांत आली असून त्यांनी १७ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे़ तर १३ जागांवर श्रमजीवी, ६ जागांवर राष्ट्रवादी, काही जागांवर मनसे व काहींवर अपक्ष असे एकूण ७७ उमेदवार सध्या रिंगणात आहेत़ ११ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होईल़दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून पक्षामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली असतांनाही त्यांना एैन वेळेवर उमेदवारी नाकारल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातील काहींनी इतर पक्षांशी छुपी हातमिळवणी करुन प्रचार सुरु केल्याची माहिती आहे़ त्यामुळे जर या नाराज उमेदवारांनी इतर पक्षास मदत केल्यास भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच विकास आघाडीने देखील पूर्ण ताकदपणाला लावून व्यूहरचना आखल्याने त्याचाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे़ कारण मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या पॅनलला यश मिळालेले आहे़या निवडणुकीतील मतदान आजवर झालेली विकासकामे व उमेदवारांची प्रतिमा यावरच होणार आहे. विविध समस्यांनी ग्रासलेल्या विक्रमगड शहराबरोरच अंतर्गत गाव-पाडयांना नगरपंचायत तारणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे़ विक्रमगड नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये दिवसेंदिवस चाललेली अनाधिकृत बांधकामे, गावठाण जागेवरील अतिक्रमणे, वारंवार खंडीत होणारा पाणीपुरवठा, खेडो-पाडी निर्माण होणारी पाणीटंचाई, रोजगाराअभावी होणारे नागरिकांचे स्थलांतर, अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याची विल्हेवाट, प्रसाधगृहाचा अभाव, आदी समस्यांनी ग्रासलेल्या विक्रमगड शहरात भाजपा-सेनेचे नेतृत्व आहे. तालुका पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर राबविलेल्या अनेक विकासात्मक योजनांमुळे परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही़ त्यामुळे येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये जनमत कोणत्या पक्षाच्या बाजूने राहते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे़ परंतु या निवडणुकीमध्ये भाजपा-सेना युतीव्यतिरिक्त अन्य पक्षांची एकमेकांशी युती नसल्याने ही निवडणुक त्रिशंकू होण्याची चिन्हे दिसत आहेत़तर भाजपा सरचिटणीस विजय औसरकर यांना या नगरपंचायतीच्या निवडणूकीची सूत्रे दिली आहेत. त्यांचेकडून या पदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप ही या नाराज उमेदवारांकडून केला जात आहे़ त्यामुळे या निवडणुकीत नाराज कार्यकर्ते, त्यांचे उमेदवार यांचेकडून बंडखोरी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
विक्रमगडमध्ये नगरपंचायत निवडणुकीची धूम ७७ उमेदवार रिंगणात
By admin | Published: November 07, 2016 2:29 AM