- संजय नेवे
विक्रमगड : तालुक्यातील वेहेलपाडा ग्रामपंचायतींतर्गत पाटीलपाडा, कासपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, पासोडीपाडा, तळ्याचापाडा येथील जवळपास अडीच हजार लोकवस्तीकरिता राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३ लाख ४९ हजार ३९० रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, ही योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने येथील जनतेला पाण्यासाठी अजूनही वणवण भटकावे लागत आहे.वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली. यात योजनेतील अंदाजपत्रकात नवीन विहीर, पंपगृह, पंम्पिंग यंत्रसामग्री, ऊर्ध्ववाहिनी, उंच पाणी साठवणूक टाकी, वितरण वाहिनी, शुद्धीकरण व्यवस्था व विद्युत जोडणी करणे अपेक्षित होते. या योजनेकरता जलस्रोत बघून नवीन विहीर बांधकाम न करता सन २००४-०५ जलस्वराज्य प्रकल्पामधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. २०१५ मध्ये कार्यादेश देण्यात आले होते; परंतु सन २०१८ मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. थोडेच दिवस येथील जनतेला पाणी मिळाले. नंतर ही पाणीपुरवठा योजना बंद पडून आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही गेली दोन वर्षे उलटून गेली तरीही येथील कासपाडा, पाटीलपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, तळ्याचापाडा या अडीच हजार लोकवस्तीला या योजनेतील नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळत नाही.
ही योजना विद्युत बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहे. ग्रामपंचायतीला हा विषय सोडवण्यासाठी सूचित केले असून, काही पाडे हे जास्त अंतरावर आहेत. त्या पाड्यांकरिता त्यांच्या शेजारील विहिरीमधून मिनी नळ योजनेची अंमलबजावणी करून पाण्याचा प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभाग करत आहे. - राजेश पाध्ये, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, वाडा-विक्रमगड
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३.४९ लाख खर्च करूनसुद्धा येथील लोकांना पाणी मिळत नाही. या योजनेकरता जलस्रोत बघून नवीन विहीर बांधणे बंधनकारक असताना ठेकेदाराने २००४-०५ साली जलस्वराज्य प्रकल्प योजनेतून बांधलेल्या विहिरीत विद्युत पंप बसविले आहेत. हे पाणी लवकरच कमी होते. या योजनेकरता नवीन जलस्रोत बघून सर्व पाड्यांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी. -विश्वनाथ गहला, ग्रामस्थ, वेहलपाडा ग्रामपंचायत