कॉंग्रेसच्या गटनेतेपदी विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती, यासिन कुरेशी यांची अवघ्या एका वर्षातच उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:52 PM2018-04-04T17:52:20+5:302018-04-04T17:52:20+5:30
अवघ्या एका वर्षाच्या आतच कॉंग्रेसच्या गटनेतेपदावरुन यासिन कुरेशी यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी आता विक्रांत चव्हाण यांची नियुक्त झाली आहे.
ठाणे - स्थायी समितीसाठी शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे गटनेते यासिन कुरेशी यांना चांगलेच महागात पडले आहे. अखेर अवघ्या एका वर्षातच कुरेशी यांची गटनेतेपदावरुन उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी आता विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला हाताशी घेऊन स्थायीचे गणिते जळवु पाहणाऱ्या शिवसेनेला देखील हा धक्का बसला आहे.
ठाणे महापालिकेत इतिहासात प्रथमच शिवसेनेने एक हाती सत्ता संपादीत केली. परंतु स्थायीचे गणिते जुळविण्यासाठी त्यांना कुबड्यांची मदत घ्यावी लागली होती. भाजपाने हात वर केल्याने सुरुवातीला शिवसेनेने स्थायी समितीची गणिते जुळविण्यासाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी देखील झाला होता. कॉंग्रेसचे गटनेते यासिन कुरेशी यांनी स्थायीसाठी शिवसेनेला पाठींबा देण्याचे पत्र दिले होते. परंतु कॉंग्रेसच्या इतर दोन नगरसेवकांनी हा पाठींबा चुकीचा असल्याचे सांगत तो न देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतरही शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. अखेर त्यांनी देखील स्थायीचा नाद सोडून दिला. एकीकडे कॉंग्रेसने माघार घेतली आणि दुसरीकडे पाठींबा देण्यास तयार नसल्याने शिवसेनेने सुध्दा स्थायीचा हट्ट सोडला होता. त्यानंतर नव्या आर्थिक वर्षात पुन्हा स्थायी समितीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु या हालचालींना पुन्हा एकदा ब्रेक लागल्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. शिवसेनेला टाळी देणे यासिन कुरेशी यांना महागात पडले असून त्यांची अवघ्या एका वर्षातच गटनेतेपदावरुन गच्छंती झाली आहे. त्यांच्या जागी आता नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची नियुक्त पक्षाने केली आहे. त्यामुळे आता स्थायी समितीची गणिते देखील बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.