डोंबिवली : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून भारताची ख्याती आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा कणा म्हणजे निवडणूक. देशात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुका होतात. निवडणुकीची प्रक्रिया कशी चालते, त्यात उमेदवार कसे रिंगणात उतरतात, मतदार मतदानाचा हक्क कसा बजावतात, मतमोजणी आदी टप्पे विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत, यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेत नुकतीच निवडणूक घेण्यात आली. त्यात विलास राठोड हा विद्यार्थी १०६ मतांनी मुख्यमंत्री म्हणून निवडून आला. राठोड याच्या मंत्रिमंडळाचा वर्षभर चालणाऱ्या शालेय कार्यक्रमात सहभाग असणार आहे.शाळेतर्फे राबवल्या जाणाºया उपक्रमात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा, शाळेच्या भौतिक गरजा ग्रामस्थांनी सोडावाव्यात, तसेच विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्राचे धडे प्रत्यक्ष गिरवता यावेत, या उद्देशाने १२ वर्षांपासून शाळेत हा उपक्रम राबवला जातो. या निवडणुकीत इयत्ता पाचवी ते आठवीच्या २०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्यक्ष रिंगणात २४ उमेदवार होते. शाळा १५ जूनला सुरू झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मुलांना दररोज परिपाठात निवडणुकीची माहिती सांगितली जात होती. निवडणुकीत उमेदवारांचे वय, मतदानासाठी वय, सरपंच ते पंतप्रधान यांच्या निवडणुका कशा होतात, बोटाला शाई का लावली जाते, मतदान गुप्तपणे चालते ते का, कधीकधी निवडणुका पुढे का ढकलल्या जातात, निवडलेले सदस्य आपला कारभार कसा करतात, याची माहिती शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.खºयाखुºया निवडणुकीप्रमाणे विद्यार्थ्यांनी मधल्या सुटीत प्रचार केला. त्यात आम्ही आपल्या शाळेतील तुमच्या लहान भावंडांचा सांभाळ करू. त्यांना अभ्यासात मदत करू. त्यांचे खेळ घेऊ. क्रीडा स्पर्धेत जास्तीतजास्त मुलांना सहभागी करून घेऊ. दोन नाटके शाळेतर्फे बसवू, अशी आश्वासने मुलांनी देत निवडणूक लढवली.शिक्षक अजय पाटील यांच्या संकल्पनेनुसार झालेल्या या निवडणुकीत २०५ विद्यार्थ्यांनी मतदान केले. मात्र, पाच मते बाद झाल्याचे निवडणूक आयुक्त म्हणून काम केलेले शिक्षक महेंद्र अढांगळे यांनी सांगितले. शिक्षिका स्मिता धबडे, शर्मिला गायकवाड, सविता नवले, मंगला आंबेकर या शिक्षकांनी मतमोजणी केली. या निवडणुकीत विजय राठोड, सारिका नरळे, पारू जाधव, श्वेता राठोड, मयूरी चव्हाण, विलास राठोड, करण गोंड, शिवानी संभाजी, सानिया सुतेले, अनिश पुजारी, मनोज चव्हाण, साहिल पवार हे ११ उमेदवार जास्त मते घेऊन निवडून आले. पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.असे आहे मंत्रिमंडळमुख्यमंत्री विलास राठोड, उपमुख्यमंत्री सारिका नरळे, सांस्कृतिकमंत्री सानिया सुतेले, स्वच्छतामंत्री मयूरी चव्हाण, क्रीडामंत्री पारू जाधव, सहलमंत्री साहील पवार, शिक्षणमंत्री अनिश पुजारी, पर्यावरणमंत्री मनोज चव्हाण, आहारमंत्री शिवानी संभाजी, करण गोंड पदभार सांभाळणार आहेत.
पिसवलीच्या विद्यार्थ्यांनी गिरवले निवडणुकीचे धडे, विलास राठोड मुख्यमंत्री, तर सारिका नरळे उपमुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 3:08 AM