ठाणे : भिलारच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही एक पुस्तकांचे गाव व्हावे, अशी इच्छा असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंगळवारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले. ठाणे ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुस्तकाच्या वैभवाप्रमाणे ठाणे जिल्ह्यात ऐतिहासिक वैभव देखील आहे. त्यामुळे येथे वस्तूसंग्रहालयाला जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल असा पुनरुच्चार केला.मराठी ग्रंथसंग्रहालयात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आयोजित ग्रंथोत्सवास सुरुवात झाली असून मंगळवारी त्याचे उद्घाटन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. नार्वेकर म्हणाले की, मुंबईलगतच्या झपाट्याने पसरलेल्या ठाणे शहरात आज उड्डाणपूल, मोठे रस्ते, मेट्रो आपण पाहत आहोत, ही सगळी या शहराची इंद्रिये आहेत. मात्र, ग्रंथ, साहित्य, कला, संस्कृती यांची जोपासना करणाऱ्या ठाण्यातील संस्था पाहिल्या की वाटते हा शहराचा आत्मा आहे. कल्याण-भिवंडी येथील वाचनालयांना आपण भेटी दिल्या असून जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी ई बुक्सच्या माध्यमातून ही सर्व ग्रंथ संपदा टिकवावी तसेच विशेषत: युवा पिढीला सहजपणे उपलब्ध करून द्यावी असेही ते म्हणाले. वाचनाची आवड कमी झाली तरी वाचनाचे माध्यम बदलले आहे. तरुणांपर्यंत पुस्तकांचा ठेवा त्यांच्यापद्धतीने पोहोचविल्यास त्यांना वाचनाकडे नेता येईल, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. मराठी ग्रंथ संग्रहालयानेही आधुनिक कास धरून सुरू केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. कर्मचाºयांच्या वेतनासाठी तरतूद झाल्यास ग्रंथालयांचे रुप बदलेल अशी आशा कवी अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केली. ग्रंथालय संचालक सु.हि.राठोड, ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ, कार्यवाह चांगदेव काळे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती यावेळी उपस्थित होते.
>ग्रंथांचा प्रवास समृद्ध करणारा - प्रकाश खांडगेलौकिक अर्थाने ग्रंथांशी आपल्या आयुष्याची सुरु वात बाराखडीच्या पुस्तकापासून ते ज्ञानकोशांपर्यंत जाते. ग्रंथ आपल्या सोबत वाढतात, प्रवास करतात, आपल्याशी बोलतात. मौखिक परंपरेतुन लिखितापर्यंत झालेला ग्रंथांचा प्रवास आपल्याला समृद्ध करत जातो, असे प्रतिपादन लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे मंगळवारी यांनी केले.मराठी ग्रंथ संग्रहालयात सुरू असलेल्या ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात ‘ग्रंथांनी मला काय दिले’, या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी साहित्यिक कृ. ज. दिवेकर यांनी फक्त वाचन न करता लिहिण्याचाही प्रयत्न करा असा सल्ला दिला. विज्ञान लेखक अ.पा.देशपांडे म्हणाले की, ग्रंथांमुळे भाषा सुधारते. वैचारिक पातळी सुधारते. चरित्र वाचनामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो तर निवेदिका वासंती वर्तक म्हणाल्या की, चांगले जगायला, चांगले व्यक्त व्हायला, चांगले माणूस व्हायला ग्रंथ शिकवितात. या परिसंवादाचे देशपांडे होते. यानंतर अशोक बागवे, राजीव जोशी, सतीश सोळांकुरकर, भगवान निळे, साहेबराव ठाणगे, आदित्य दवणे, वृषाली विनायक, नितल वढावकर, संकेत म्हात्रे यांनी ‘काव्य संमेलन’ गाजविले. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन दुर्गेश आकेरकर यांनी केले.>पुस्तके डिजिटल करानार्वेकर यांनी ग्रंथसंग्रहालय परिसरातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन काही पुस्तकांची खरेदीही केली. विशेषत: दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन पाहून ते प्रभावित झाले. अशा पुस्तकांचा ठेवा डिजिटल स्वरुपात संग्राह्य केला पाहिजे अशी गरज त्यांनी बोलून दाखिवली. याठिकाणी भिवंडी येथील वाचन मंदिर, ठाणे नगर वाचन मंदिर, डोंबिवली येथील स्वामी समर्थ वाचनालय यांनी ठेवलेल्या दुर्मिळ पुस्तकांविषयी त्यांनी चर्चा केली.