ठाणे : शहापूर तालुक्यातील दळखण गावात ग्रामसेवक पदावर कार्यरत असणाऱ्या माधवी कदम यांचा प्रशासकीय प्रवास आणि कोरोनाकाळात त्यांनी गावाची खऱ्या अर्थाने केलेली सेवा वाखाणण्यासारखी आहे.
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्या ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्या. सांगली जिल्ह्यात पहिली पोस्टिंग मिळाली. परिस्थितीच माणसाला समजदार बनवते हेच माधवी यांच्याबाबतीत घडले. त्यांची कौटुंबिक स्थिती तशी बेताचीच होती. वडील अल्प भूधारक शेतकरी, कुटुंबाची जबाबदारी यांच्यावरच होती. लग्नानंतर २०१२ साली त्या ठाण्यात आल्या. कल्याणच्या नडगाव ग्रामपंचायतीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. २०१९ साली बदली होऊन त्या दळखण गावात ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्या. उत्तम कामे केले. मात्र, खरी परीक्षा होती ती कोरोनाकाळात. या गावातही सुरुवातीला रुग्णसंख्या वाढत होती आणि मृत्युमुखी पडणाऱ्याची संख्याही ५० टक्के होती. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह त्या अग्रस्थानी होत्या. गावातील बांधव उपाशी राहू नये यासाठी दात्यांच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवठा करण्याकडेही त्यांचे लक्ष होते. गावातील गरोदर महिला व वयोवृद्ध मंडळी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरत होते. यासाठी गावामध्ये प्राथमिक उपचार करण्यासाठी हॉस्पिटल व ॲम्ब्युलन्सची सेवा चालू करण्यात त्या पुढे होत्या. ‘घरी माझी ६ वर्षांची मुलगी आहे, त्यामुळे या काळात काम करताना थोडी काळजी वाटत होती; पण आपण ज्या गावात काम करतो त्या गावातील जनतेचे हित प्रथम लक्षात घेत मी काम केले. माझ्या कुटुंबियांच्या सहकार्याशिवाय हे काम करणे शक्य नाही’, असे माधवी कदम सांगतात.