सुरेश लोखंडे, ठाणे : भिवंडीतील अनगाव येथील जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेत व्हावा. येथील कामकाज भौतिक दृष्ट्या पूर्ण झाले आहे.मात्र मुंबई महानगर महापालिकेमार्फत जल जोडणी रखडली आहे. या जाेडणीचे काम पूर्ण हाेताच येत्या १० दिवसांत अनगावात पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल, असे भिवंडीतील विकास कामांच्या आढाव्य प्रसंगी उघड झाले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसाेदे यांनी भिवंडी पंचायत समितीला अचानक भेट देऊन विविवध विकास कामांची पाहाणी करून आढावा घेतला. त्यात अनगांवमधील जलजीवन मिशनच्या कामावर चर्चा झाली. त्यात मुंबई महापालिकेकडून जल जाेडणीचे काम अजून पूर्ण करण्यात आलेले नाही. ते पूर्ण हाेताच अनगांवमधील रहिवाश्यांना या जलजीवन मिशनच्या नळपाणी पुरवठ्याचा लाभ घेता येणार असल्याचे उघउ झाले. त्यासाठी भिवंडीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे व उप अभियंत्यांना काम तत्काळ पूर्ण करण्यासह माझी वसुंधरा अंतर्गत दिलेल्या कामाविषयी माहिती घेत वेळेत काम पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना अंतर्गत अकलोली ग्रामपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम पाहणी करण्यात आली. प्रादेशिक पाणीपुरवठा संदर्भातील जल जीवन मिशन अंतर्गत विहिरींची कामांची पहाणी करून पाणी शुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर प्लान्टला भेट दिली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तपासण्यात आली. वज्रेश्वरी ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. पुढील महिन्यातील वज्रेश्वरी देवीच्या यात्रेसंदर्भात पूर्व नियोजन करण्यासाठी सुचना शिसाेदे यांनी दिल्या.
वज्रेश्वरी यात्रेत स्वच्छ्ता, पिण्याचे पाणी, रस्ता व इतर सोयीसुविधांवह पहाणी करीत असतनाच शिसाेदे यांनी गणेशपुरीचे पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके, सरपंच, ग्रामसेवक व कमिटी सोबत सविस्तर चर्चा यावेळी केली. यादरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी येथे जावून प्रत्यक्ष पाहणी करीत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर अनगाव येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या आरोग्य केंद्राची पहाणी करण्यात आली.