भिवंडी : चाविंद्रा डम्पिंग ग्राऊण्डवर महानगरपालिकेने कायमस्वरूपी कचरा टाकणे बंद करावे, यासाठी परिसरांतील ग्रामस्थ आंदोलन करून सोमवारी कचऱ्याच्या गाड्या अडविणार आहेत.महानगरपालिकेने चाविंद्रा येथील बगीच्यासाठी राखीव जागेत भरणी करण्याच्या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून कचरा टाकण्याचे काम सुरू केले आहे. या जागेच्या खड्ड्यात भरणी कधीच झाली. आता तेथे कचऱ्याचे ढिगारे तयार होऊ लागले आहेत. त्यावर माती अथवा औषधे फवारणी होत नसल्याने परिसरांत दुर्गंधी पसरत आहे. पालिकेच्या शाळेतील मुले व शिक्षक आजारी पडू लागल्याने शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहे. तरीही पालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग पर्यायी व्यवस्था न करता तेथेच कचरा टाकत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे डम्पिंग ग्राऊण्ड कायमस्वरूपी बंद करण्यासाठी स्थानिक समाजसेवक अनंता पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागाव, चाविंद्रा, पोगाव, रामनगर, गायत्रीनगर येथील नागरिक तसेच शिक्षकांसह विद्यार्थी येत्या सोमवारी, १६ जानेवारीला सकाळी ९ वाजल्यापासून पालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या अडवून माघारी पाठविणार आहेत. प्रशासनाने कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, यासाठी अनंता पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहीचे पत्र पालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना दिले आहे. या आंदोलनास गालबोट लागू नये यासाठी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनाही पत्र दिले आहे. (प्रतिनिधी)
चाविंद्रा डम्पिंगविरोधात ग्रामस्थांचे कचराबंद
By admin | Published: January 12, 2017 5:53 AM