नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरालगत असलेल्या काटे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत केमिकल साठवणूक होत असल्याने या अनधिकृत केमिकल गोदामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून या केमिकल साठ्यांना आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल करत या अनधिकृत केमिकल गोदामांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी काटई ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी मंगळवारी केली आहे.
भिवंडीतील राहनाळ, पूर्णा, काल्हेर आदी परिसरात केमिकल गोदामांना आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर येथील केमिकल गोदामांवर कारवाई केल्यानंतर केमिकल माफीयांनी आपले बस्तान शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीत बसवले आहे. काटई ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत केमिकल साठ्याच्या गोदामामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून अनेक वेळा केमिकलची वाहतूक करताना रस्त्यावर केमिकल पडल्याने नागरिकांना इजा होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. गोदामात साठवलेले हे केमिकल इतके घटक आहे की या गोदामात काम करणाऱ्या कामगारांचे हात देखील केमिकलने भाजले असल्याची माहिती समोर आली आहे.नागरिकांच्या जीवाला धोका असलेल्या या घातक केमिकल गोदामांवर लवकरात लवकर शासनाने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी काटई ग्राम पंचायतीच्या सरपंच छाया पाटील यांच्यासह माजी सरपंच शरद पाटील व भावेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.