नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी कल्याण मुख्य रस्त्यावर कोनगाव ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेली प्रिझम रेसिडेन्सी हि लॉजिंग बोर्डिंग कोनगाव येथील आठगाव शाळेच्या बाजूला असल्याने त्याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता या लॉजिंगवर कारवाई करावी करत तात्काळ बंद करण्याच्या मागणी साठी स्थानिक ग्रामस्थ तथा आरपीआय सेक्युलर तालुका सचिव जितेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मंगळवारी आमरण उपोषण सुरू केले आहे . आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस ऍड किरण चन्ने यांनी आंदोलनकर्त्यांची व भिवंडी प्रांत कार्यालयात भेट देत नागरिकांची समस्या मांडून लॉजिंगवर कारवाई करण्याची मागणी केली.
या उपोषण आंदोलनात जितेंद्र जाधव यांसह राजू म्हात्रे ,दीपक मुकादम, भगवान भोईर,सुनील म्हात्रे,सुरेखा गायकवाड,वैशाली जाधव, अश्विनी मेस्त्री आदी ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. तर या लॉजिंग वर स्थानिक ग्रामपंचायती कडून मालमत्ता कर आकारणी केली गेली नसून नुकताच झालेल्या ग्रामसभेत प्रिझम रेसिडेन्सी लॉजिंग तात्काळ बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला असतानाही उपविभागीय अधिकारी कार्यालया कारवाई का करीत नाहीत या बद्दल जितेंद्र जाधव यांनी चिंता व्यक्त करीत जो पर्यंत लॉजिंग बंद होत नाही तो पर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे .
तर ग्रामस्थांच्या मागणीची भिवंडी प्रांताधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी व लॉजिंगवर कारवाई करावी अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात सेक्युलरच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आरपीआय सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस ऍड किरण चन्ने यांनी प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला.
तर लॉजिंग बोर्डिंग संदर्भातील प्रांताधिकारी कार्यालयाचे अधिकार शासनाने काढून घेतले असून संबंधित लॉजिंग मालकाने आवश्यकत्या परवानग्या घेतल्या असल्याचे लेखी माहिती उपलब्ध असून या विषयी लवकरच एका सभेचे आयोजन करून हा विषय निकाली काढण्यात येईल अशी प्रतिक्रिया भिवंडी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांनी दिली आहे.