भिवंडी : शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील एका अनधिकृत कंपनी मधील केमिकलच्या उग्र वासाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय जाहीर केल्या नंतर खडबडून जागे झालेल्या तहसील प्रशासनाने तातडीने ग्रामस्थां सह महसूल ,प्रदूषण नियंत्रण मंडळ,पंचायत समिती,एमएमआरडीए व पोलिस अधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
खोणी ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कपड्यावर रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग कंपन्या वसलेल्या आहेत. त्याच परिसरात एक केमिकल कंपनी सुरू असून त्याठिकाणी केमिकल प्रक्रिया केली जाते, त्यामुळे या संपूर्ण परिसरात उग्र वास पसरत असल्याने नागरिकांना श्वसनाच्या व घशाचा त्रास होऊन डोळे चुरचुरणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. मागील चार वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार,जिल्हाधिकारी,पंचायत समिती, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे करून ही कोणतीही कारवाई होत नसल्याने हवालदिल झालेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती ग्रामस्थ अरुण पाटील यांनी दिली.
या निर्णयाची दखल तात्काळ तहसीलदार अभिजित खोले यांनी घेतली व सोमवारी सायंकाळी त्यांच्या नेतृत्वा खाली प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी,एम एम आर डी ए,ग्रामपंचायत व पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तात्काळ कंपनी वर कारवाईचे निर्देश तहसीलदार अभिजित खोले यांनी दिले.या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.