कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातील उसाटणे गावात उल्हासनगर महापालिकेने डम्पिंग ग्राउंडसाठी जागा प्रस्तावित केली आहे. मात्र, येथील ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंडला विरोध केला आहे. दुसऱ्या शहरातील कचरा आमच्या गावात का, असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रस्तावित डम्पिंग रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उल्हासनगरमध्ये नव्या प्रकल्पासाठी जागाच नाही. उल्हासनगरचा कचरा हा म्हारळ येथील डम्पिंगवर टाकला जात आहे. म्हारळ येथे कचºयाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यावर महापालिकेकडून प्रक्रिया केली जात नाही. म्हारळ हे कल्याण तहसीलअंतर्गत येते. उल्हासनगर पालिकेने उसाटणे गावात डम्पिंग ग्राउंडसाठी जागा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ३० एकर जागा घेतली असून ११ एकर जागा हस्तांतरित केल्याचे सांगण्यात येते. उसाटणे हे गाव अंबरनाथ-शीळ मार्गावरील खोणी-तळोजा मार्गावर आहे. उसाटणेला लागूनच मलंगगड आहे. हा परिसर निसर्गरम्य आहे. मलंगगड परिसरात कुशिवली धरण प्रस्तावित आहे.
या निसर्गात ही गावे वसली आहेत. डम्पिंग झाल्यावर नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी गायकवाड यांनीही डम्पिंगला विरोध दर्शवला आहे. म्हारळ येथील बिल्डरच्या हितासाठी डम्पिंगची जागा बदलून ती उसाटणे येथे नेली असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. यामुळे वाद उफाळण्याची शक्यता आहे.
गावांच्या विकासाऐवजी आमच्या माथी मारला कचरा
वर्षभरापूर्वी उसाटणे गावाजवळील करवले गावात मुंबई महापालिकेने १०० एक जागा डम्पिंगसाठी घेतली आहे. करवले ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. उसाटणे गावाजवळ २६४ हेक्टर जागेवर एमएमआरडीए क्षेत्रतील सर्व महापालिका व पालिका हद्दीतील कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी सामायिक भरावभूमी कचरा प्रकल्प आघाडी सरकारने २०१० मध्ये प्रस्तावित केला होता. मात्र, हा प्रकल्प आघाडी सरकारने २०१४ मध्ये गुंडाळला. पुन्हा सहा वर्षांनी डम्पिंगचा प्रस्ताव आला आहे. गावांना विकास हवा आहे, तो न देता, शहरातील कचरा माथी मारला जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. करवले व उसाटणे या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड झाल्यास चिंचवली, मलंगवाडी, चिरड, पाली या गावांचे आरोग्यही धोक्यात येणार आहे.