- पंकज पाटील अंबरनाथ : अंबरनाथ येथे एका अंत्यविधीसाठी आलेल्या सातारा येथील कोरेगावमधील ग्रामस्थांनी अंबरनाथमधील स्मशानभूमीची दुरवस्था पाहून ही स्मशानभूमी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. अंत्यविधीच्यावेळी झालेली गैरसोय आणि अस्वच्छता पाहून दोन दिवसांत लागलीच साताºयातील ग्रामस्थांनी एकत्रित येत मोरिवली गावातील स्मशानभूमी स्वच्छ केली. अंबरनाथ पालिकेलाही लाजवेल, असे काम या ग्रामस्थांनी केले आहे. एवढे सगळे करूनही पालिकेला स्मशानभूमीच्या दुरवस्थेकडे लक्ष देण्यासाठी वेळच नाही.अंबरनाथ शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था हा नवीन विषय राहिलेला नाही. मुख्य स्मशानभूमीसह शहरात अनेक ठिकाणी ग्रामस्थांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीही साकारण्यात आली आहे. मात्र, या स्मशानभूमीची स्वच्छता करण्यासाठी पालिकेला आणि पालिकेच्या आरोग्य विभागाला वेळच नसल्याचे दिसते. मोरिवलीमध्ये ग्रामस्थांसाठी असलेली स्मशानभूमी ही झाडाझुडुपांत होती. २८ डिसेंबरला गावातील काकासाहेब मतकर यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी याच स्मशानभूमीवर नेण्यात येणार होते. मात्र, स्मशानभूमीची अवस्था बिकट असल्याने मोरिवली गावातील नागरिकांनी तात्पुरती स्वच्छता करून अंत्यविधी पार पाडला. या अंत्यसंस्कारासाठी साताºयातील कोरेगाव तालुक्यातील विखळे गावातील ग्रामस्थही आले होते. त्यांनीही स्मशानभूमीची अवस्था पाहिल्यावर स्वच्छता करण्याची गरज व्यक्त केली.अंत्यविधी पार पडल्यावर दोन दिवस झाले, तरी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छता केली नाही. अखेर, ३१ डिसेंबरला राख सावरण्याच्या विधीच्यावेळी विखळे गावाचे सरपंच अप्पासाहेब मतकर यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. अंबरनाथकरांना जे शक्य झाले नाही, ते काम या सातारा जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केले. दिवसभर श्रमदान करत संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली. कुणाचीही मदत न घेता मतकर आणि त्यांच्या सहकाºयांनी संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करून एक आदर्श घालून दिला. ज्या गावाशी त्यांचा काहीएक संबंध नव्हता, अशा गावात त्यांनी आदर्श निर्माण केला. पुढारी कसा असावा, हे दाखविण्याचे काम मतकर यांनी केले आहे.अंबरनाथच्या नागरिकांची मान शरमेने खालीजे काम अंबरनाथ पालिका प्रशासनाने करणे गरजेचे होते. ते काम बाहेरील गावातील ग्रामस्थ येऊन करत असल्याने अंबरनाथकरांची मान शरमेने खाली गेली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या या कामाचे कौतुक शहरभर होत आहे. समाजमाध्यमांवरही त्याची चर्चा रंगली आहे.
साताऱ्यातील ग्रामस्थांनी स्वच्छ केली स्मशानभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:37 PM