अश्विनी भाटवडेकर ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात एप्रिल आणि मे हे महिने पाणीटंचाईचे. त्यामुळेच धरणे असूनही पाण्यासाठी वणवण करणे ग्रामस्थांच्या नशिबी येते. दरवर्षीचा हा त्रास दूर करण्याचे वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे गावकऱ्यांमध्ये जागृती करून वनराई बंधारे बांधले देखील. आता या बंधाऱ्यातील पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत तरी निश्चितच पुरेल, असे ‘वसुंधरा’चे पवन वाडे सांगतात.
शहापूर तालुक्यातील धरणांना लागूनच असलेले एक गाव, साकडबाव. गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजार. यंदा तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाण्याचा त्रास सुरू झाला. येथेही टंचाई भेडसावू लागली. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या मदतीने शिकणाºया विद्यार्थ्यांनी ही बाब वसुंधरा संजीवनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली. त्यांनी देखील याची दखल घेत परिस्थितीची पाहणी केली. आणि सुरुवातीला तात्पुरता उपाय म्हणून वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी लोकांकडूनच श्रमदान करून घेण्याचे ठरवले. त्यादृष्टीने लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, याबाबत त्यांना माहिती दिली. आणि मग लोकांच्या मदतीने सिमेंटच्या पिशव्यांच्या सहाय्याने या कार्यकर्त्यांनी येथे ३ वनराई बंधारे बांधले. ज्यायोगे येथे पाणी साठून रहायला लागले. हेच पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत तरी निश्चितच पुरेल असा विश्वास वसुंधराच्या कार्यकर्त्यांना आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्तचा प्रश्न तरी सध्या थोड्याफार प्रमाणात सुटल्याचे वाडे यांचे म्हणणे आहे.
यापुढचा टप्पा म्हणजे चेक डॅम. वनराई बंधाऱ्यांच्या तुलनेत हा अधिक भक्कम असतो. आणि जास्त पाणी साठून राहण्यास मदत होते. वास्तविक, शहापूर तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती. वर्षभर ही शेती करता यावी, लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. यादृष्टीने ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, त्यांना अशाप्रकारे पाणी साठवून ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्याचे काम सुरू असून ग्रामस्थांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे ते सांगतात.
शहापूर तालुक्यात हे काम सुरू करण्यापूर्वी या संस्थेने मुरबाड तालुक्यातही काम केले.शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस पडतो. पण येथे पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. हे वाहते पाणी अडवण्याची काही ना काही सोय हवी. अनेक सरकारी योजना तर लोकांना ठाऊकच नाहीत. त्याबाबतही जनजागृती व्हायला हवी.अलीकडे सर्रास बोरवेल खोदल्या जातात. यासाठी ड्रिलिंग करावे लागत असल्याने हे पर्यावरणाला हानीकारक आहे. त्यामुळेच हा बंधाºयांचा पर्याय अत्यंत उत्तम आणि तुलनेने सोपा आहे.