ठाणे : दूरदर्शन मुंबईच्या स्थापनेपासून कार्यरत असणारे निर्माते विनायक चासकर यांचे बुधवारी मध्यरात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. दूरदर्शनवर अनेक उत्कृष्ट कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली. त्यांचा गजरा हा कार्यक्रम अतिशय गाजला. त्यातून लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर यासारखे अनेक कलाकार लोकप्रिय झाले. ठाणे येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
दूरदर्शनला सर्वाेत्तम कलाकृती विनायक चासकर यांनी दिली होती. त्यांचा स्मृतिचित्रे हा कार्यक्रमही त्यावेळी अत्यंत गाजला होता. या कार्यक्रमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच काळात आश्रित हे नाटकही खूप गाजले होते. या नाटकालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लक्षीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, रत्नाकर मतकरी, विनय आपटे, सुरेश खरे, किशोर प्रधान, सुमती गुप्ते यांना मराठी चित्रपटसृष्टीत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. १९७२ साली दूरदर्शनची स्थापना झाल्यापासून ते दूरदर्शनमध्ये कार्यरत होते. दूरदर्शनमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक दर्जेदार, सदाबहार मालिकांची, त्याचबरोबर अनेक दमदार कार्यक्रमांची निर्मिती केली. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर ते मुंबई दूरदर्शनमध्ये निर्माते म्हणून काम करत होते. दूरदर्शनमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
---