जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लावल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने माेठा कारवाईचा बडगा उगारला. यात पहिल्या लाटेच्या वेळी सहा कोटी एक लाख ५६ हजार ४००, तर दुसऱ्या लाटेच्या दरम्यान तब्बल १२ कोटी ४६ लाख ४८ हजार १०० असा १८ कोटी ४८ लाख चार हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १ मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान लावलेल्या लॉकडाऊन काळात मोटारसायकलीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या सात हजार ६३५ जणांकडून १५ लाख २७ हजारांचा दंड वसूल झाला. विशेष म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्याही लाटेच्या वेळी विनामास्क वाहन चालविताना एकही न आढळल्यामुळे अशा कोणावरही कारवाई करण्याची वेळ आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. एक लाख सात हजार ४४ जणांविरुद्ध विनाहेल्मेटची कारवाई झाली. त्यांच्याकडून पाच कोटी ३५ लाख २२ हजार रुपये वसूल झाले. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या दहा हजार सहा जणांकडून २० लाखांचा दंड वसूल झाला, तर विनालायसन्स फिरणाऱ्या १५ हजार ५७ जणांकडून ७५ लाख २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. पोलिसांचा आदेश झुगारणाऱ्या ८८ हजार ६७८ चालकांकडून चार कोटी ४३ लाख ३९ हजारांचा दंड वसूल झाला.
दुसऱ्या लाटेच्या वेळी १२ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी १ मार्च २०२१ ते १८ जून २०२१ या कालावधीत ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने एक लाख ३६ हजार ४९२ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून १२ कोटी ४६ लाख ४८ हजार १०० असा दंड वसूल केला आहे. ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन हजार ५०८ जणांकडून सात लाखांचा दंड वसूल केला. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चार हजार ४६१ जणांकडून आठ लाख ९२ हजारांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे पोलिसांचा आदेश झुगारणाऱ्या ४४ हजार ४७२ जणांकडून दोन कोटी २२ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
................................
ट्रिपल सीट - २२,२८,६००
विनामास्क - ०
विनाहेल्मेट - ८,१८,२८,०००
नो-पार्किंग - १,८६,७५,४००
मोबाइलवर बोलणे - २८,९३,४००
विनानंबर प्लेट - ३४,६००
फॅन्सी नंबर प्लेट - ११,६१,०००
विनालायसन्स - १,१४,०८,५००
...............................
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या दरम्यान कोरोनाचे संक्रमण वाढू नये म्हणून लॉकडाऊन केला होता. याच काळात प्रवासादरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मोटारसायकलींवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या, रिक्षातून जादा प्रवाशांच्या वाहतूक करणाऱ्यांवर बंदी होती, तरीही अशी वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. ठाणे शहर आयुक्तालयात १८ युनिटसह आणखी काही विशेष पथकेही त्यासाठी कार्यरत होती.
- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर