लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या रुग्णांमध्ये जशी वाढ होत आहे, त्याप्रमाणे आता ठाणे शहर पोलिसांनीही आपल्या कारवाईची धार अधिक तीव्र केली आहे. गेल्या २५ दिवसांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात स्थानिक पोलिसांनी एक हजार ९१८ वाहन धारकांवर कारवाई केली. तर वाहतूक नियंत्रण शाखेने ६५२ चालकांवर कारवाई केली. आतापर्यंत आयुक्तालयामध्ये दोन हजार ५७० वाहने जप्त करण्यात आली आहेत.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३५ पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. ठाण्यातील राबोडी, मुंब्रा आणि कळवा तसेच भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरच्या काही भागांमध्ये राज्य राखीव दलाच्या तुकडयाही तैनात केल्या आहेत. ठाण्यात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २२ मार्च ते १४ एप्रिल या २३ दिवसांच्या कालावधीमध्ये ४६५ वाहने जप्त केली. यामध्ये रिक्षा, मोटारसायकल आणि कार आदी वाहनांचा समावेश आहे. तर भिवंडीमध्ये पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २२८ वाहनांवर कारवाई करुन संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले. ही सर्व वाहने जप्त केली आहेत. तर कल्याणमध्ये उपायुक्त व्ही. एम. पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी ३०५ वाहने जप्त केली. परिमंडळ चार उल्हासनगरमध्ये सर्वाधिक म्हणजे ५३८ वाहनांवर जप्तीची कारवाई पोलीस उपायुक्त पी. पी. शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. तर वागळे इस्टेट परिमंडळात पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या पथकांनी ३८२ वाहन चालकांवर कारवाई केली. गेल्या २३ दिवसांमध्ये या सर्व परिमंडळांमध्ये विनाकारण दूचाकी तसेच मोटार कार घेऊन फिरणाऱ्या दोन हजार ५७० जणांविरुद्ध कलम १८८ तसेच मोटार वाहतूक कायद्यानुसार कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २५७० वाहने जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: April 16, 2020 11:40 PM
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली असतांनाही अनेकजण आपल्या वाहनांमधून शहरातील अनेक भागांमधून फिरत आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या सर्वच भागांमधून गेल्या २५ दिवसांच्या कालावधीत तब्बल अडीच हजार वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्दे उल्हासनगरमध्ये सर्वाधिक ५३८ चालकांवर कारवाईठाणे शहरात ४६५ वाहन चालकांविरुद्ध गुन्हे