लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील अनेक भागांमध्ये कडक कारवाई केली आहे. गेल्या २३ दिवसांमध्ये विनाकारण फिरणा-या १४ हजार ६८८ चालकांवर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत एक हजार १०३ वाहने जप्त केली आहेत. त्यांच्याकडून ४८ लाख २३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील मुरबाड, गणेशपूरी, शहापूर, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या परिसरात कोरोना - कोवीड १९ या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून २७ ठिकाणी नाकाबंदी केलेली आहे. या सर्व ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड तसेच पाचही विभागांचे पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त, नाका तपासणी आणि ग्रामीण भागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत गस्तही वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुरबाड आणि मीरा रोड परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे या भागात नाके तपासणी मोठया प्रमाणावर केली जात आहे. २२ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान या सर्वच भागांमधून विनाकारण फिरणा-या १४ हजार ६८८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये वाहतूक विभाग तसेच स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. याच कारवाईमध्ये एक हजार ४३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून ४६ लाख पाच हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय, विनाकारण रस्त्यावर फिरुन संचारबंदीचे उल्लंघन करणाºया ७२ आरोपींविरुद्ध १३ एप्रिल रोजी १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची ६० वाहने एकाच दिवसात पोलिसांनी जप्त केली आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी दिलेल्या वाहनांव्यतिरिक्त विनाकारण फिरणा-या ५७५ वाहन चालकांवरही १३ एप्रिल रोजी मोटार वाहन कायद्याखाली कारवाई झाली. त्यांच्याकडूनही एकाच दिवसामध्ये दोन लाख १८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नागरिकांनीही अनावश्यक घराबाहेर पडू नये. संचारबंदीचे पालन करावे. अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत एक लाख १०३ वाहने जप्त करुन त्यांच्याकडून सुमारे ४८ लाखांचा दंड वसूल केला. शिवाय, अनेकांवर संचारबंदीच्या उल्लंघनाची कारवाई केली आहे.’’डॉ. शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण