उल्हासनगर : पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या तारखेस विसर्जन न करता व अटी शर्तीचे उल्लंघन करून विनापरवाना विसर्जन मिरवणूक काढल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन गणेश मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हे दाखल केले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरातील उल्हासनगर फ्रेंडस सर्कल व २६ का राजा मित्र मंडळ या दोन गणेश मंडळाचे अध्यक्ष अरुण बालानी व गुरमित बावसिंग गिल हे आहेत. यांनी पोलिसांनी गणपती विसर्जन करीता दिलेल्या परवानगी प्रमाणे दिलेल्या तारखेस गणपती मूर्तीचे विसर्जन न करता, शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे उघड झाले. रविवारी रात्री ८ ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान दोन्ही गणेश मंडळांनी विनापरवाना मुख्य रस्त्यावरून गणपती विसर्जन मिरवणूक काढली. या प्रकरणी पोलिसांनी मंडळ अध्यक्ष अरुण बालानी व गुरमित बावसिंग गिल यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विनापरवाना निघालेल्या मिरवणुकीमुळे पोलिसांची दमछाक होऊन मुख्य रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. तसेच वाहन चालक व नागरिकांचे हाल झाले. शहरात परवानगी दिलेल्या तारखेला बाप्पाचे विसर्जन न करता, मर्जीप्रमाणे विसर्जन मिरवणूक काढून अटी शर्तीचे उल्लंघन करीत असल्याच्या प्रकारात वाढ झाली. मात्र विनापरवाना व परवानगीच्या तारखेला बाप्पाचे विसर्जन न करणाऱ्या गणेश मंडळाला प्रत्येक वर्षी महापालिका व पोलीस परवानगी देतच कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.