ठाणे : ‘अनलॉक’च्या प्रक्रियेमध्ये रिक्षामध्ये केवळ दोनच प्रवाशांना अनुमती आहे. याचे ठाणे शहरात काही ठिकाणी काटेकोर पालन केले जात आहे. तर, काही ठिकाणी नियम धाब्यावर बसविले जात आहेत. दोघांचे भाडे परवडत नसल्यामुळे शेअर रिक्षाचालकांनी यात दुप्पट वाढ केली आहे. तोंडाला मास्क आणि स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर होतोय. पण, व्यवसायावरही प्रचंड परिणाम झाल्यामुळे घर कसे चालवायचे, या चिंतेत असल्याचे अनेक रिक्षाचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनामुळे पाच महिने लॉकडाऊन सुरू होते. या काळात रिक्षा व्यवसाय संपूर्णपणे बंद होता. आता अनलॉकच्या प्रक्रियेत रिक्षामध्ये दोन प्रवाशांच्या वाहतुकीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याशिवाय, रिक्षात प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये प्लास्टिकचा कागद लावणे, सॅनिटायझर ठेवणे आणि तोंडाला मास्क लावणे, हे बंधनकारक आहे. मानपाडा परिसरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अगदी हॅण्डग्लोव्हजसह वरील सर्वच नियमांचे आपण पालन करीत असल्याचे मानपाडा येथील रिक्षाचालक बालाजी गुंडाळे यांनी सांगितले. अजूनही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रतिसाद कमी आहे. तरीही, काही प्रवासी मास्क वापरत नाहीत, दुर्लक्ष करतात. याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.
दोन प्रवाशांमध्ये भाडे कमी मिळते. मग, काही ठिकाणी सर्रास शेअर रिक्षामध्ये तीन किंवा चार प्रवासी घेऊन जाण्याकडेही कल असल्याचे पाहायला मिळते. कोरोनाची गांभीर्यता लक्षात घेता दोनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्यांपेक्षा बसणाऱ्यांनीच अधिक खबरदारी घ्यायला हवी, असा सल्लाच एका रिक्षाचालकाने दिला आहे. ज्या रिक्षा मीटरप्रमाणे चालतात, त्यांचा भाडेआकार स्थिर आहे. त्यात प्रवासीही एक किंवा दोनच घेतले जातात. एकाच कुटुंबातील तीन प्रवासी आले, तर मात्र त्यांना रिक्षात घेण्यात येत असल्याचेही ठाणे रेल्वेस्थानक येथील काही रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे सांगितले.शेअर रिक्षामध्येही दोन प्रवाशांनाच परवानगी असल्यामुळे तीन प्रवाशांचे भाडे दोघांमध्ये विभागले जाते. त्यामुळे मानपाडा ते कासारवडवली, माजिवडा, वाघबीळ आणि पातलीपाडा या मार्गांवरील शेअर भाडे दुप्पट झाले आहे. मानपाडा ते माजिवडा आधी १० रुपये घेतले जायचे. ते आता २० रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे कापूरबावडी ते ठाणे रेल्वेस्थानक २० वरून ३० रुपये, लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक १८ वरून ३०, तीनहातनाका ते ठाणे स्थानक १० ऐवजी २० रुपये, नितीन कंपनी ते स्थानक १३ ऐवजी २० रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे प्रवासीसंख्येच्या नियमाचा भुर्दंड हा प्रवाशांना सहन करावा लागत आहे.सॅनिटायझरचा वाढला खर्चदिवसभरात २५० रुपये कमवल्यानंतर गॅस आणि रिक्षामालकाला पैसे दिल्यानंतर घर चालवायचे कसे, असा यक्षप्रश्न असल्याचे राबोडीतील महंमद सलमानी यांनी सांगितले. त्यात सॅनिटायझरचाही खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत दोनपेक्षा अधिक प्रवासी घेत नसल्याचे कोरोनावर मात केलेले मनोरमानगर येथील रिक्षाचालक नाना वारभुवन यांनी सांगितले. मास्क आणि सॅनिटायझरचाही ते कटाक्षाने वापर करतात. कोरोनामुळे व्यवसायावर प्रचंड परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.लोकल बंदचा परिणामरेल्वेसेवा केवळ मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असल्यामुळे त्याचाही परिणाम रिक्षा व्यवसायावर झाल्याचे कळवा येथील चालक हरीश पगारे म्हणाले. मीटरप्रमाणे केवळ दोनच प्रवाशांना घेऊन मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत असल्याचेही ते म्हणाले. नियमाप्रमाणे दोन प्रवासी घेतो, मात्र एकाच कुटुंबातील असतील, तरच तीन प्रवासी तेही मीटरप्रमाणेच घेत असल्याचे मानपाडा येथील संगीता रवींद्र पाफळे यांनी सांगितले.
चालक, प्रवासीही विनामास्क फिरतातहाजुरी, मुंब्रा या भागांत रिक्षाचालक आणि काही प्रवासीही सर्रास मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळले. सकाळच्यावेळी सर्रास माजिवडा, मानपाडा, कापूरबावडी या भागांत नियमांचे उल्लंघन करीत दोनऐवजी तीन ते चार प्रवासी एकाच रिक्षात कोंबले जात असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. अशा प्रवासी आणि चालकांमुळे मग कोरोना संसर्ग वाढणार नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.
300 ते 500रुपये मिळतातप्रचंड मेहनत घेऊनही जिथे आधी संपूर्ण दिवसभरात एक हजार रुपये मिळायचे, तिथे केवळ ३०० ते ५०० रुपये हातावर पडतात, असे सुरेंद्र सिंग या इंदिरानगर येथील रिक्षाचालकाने सांगितले. शेअरपेक्षा मीटरवरच भर देत असून सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत असल्याचे मुन्ना यादव या ऐरोलीतून ठाण्यात व्यवसायासाठी येणाºया चालकाने सांगितले.