बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्यावतीने स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असताना फेरीवाले आणि कर्मचारी आपसात भिडले. त्यांच्यात तुंबळ हाणामारीदेखील झाली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी फेरीवाले आणि कर्मचारी पोलीस ठाण्यामध्ये आले होते; मात्र एकमेकांविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याने फेरीवाले आणि कर्मचारी यांनी परस्पर बाहेरच तडजोड केली.
बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून नेहमीप्रमाणे स्टेशन परिसरात रस्त्याच्या लगत बसणाऱ्या फेरीवाल्यांना मागे सरकवण्याचे काम सुरू होते. यावेळी एका फेरीवाल्याने बाहेर सामान ठेवल्याने त्यावरून पालिका कर्मचारी आणि फेरीवाले यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. या वादावादीचे रूपांतर हाणामारीतदेखील झाले. यात पालिकेच्या एका कर्मचाऱ्याला, तर एक फेरीवाल्याला दुखापत झाली. या हाणामारीत पालिकेचे कर्मचारी आणि फेरीवाले परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यासाठी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आले होते; मात्र एकमेकांवर गुन्हे दाखल होणार असल्याने हे प्रकरण बाहेरच्या बाहेरच मिटवण्यात आले. पालिका कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण आणि ते प्रकरण बाहेर तडजोडीच्या मार्गाने सोडविण्यात आले असले, तरी बदलापुरातील फेरीवाल्यांची मुजोरी आणि वाढती दादागिरी हे पालिकेला त्रासदायक ठरते आहे, हे नक्की.
----------