- जितेंद्र कालेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून ५० लाखांमध्ये खरेदी केलेली आॅडी आर ८ ही कार चरणजित सिंग या दिल्लीच्या दलालासाठी मात्र अनलकी ठरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या कारच्या ताफ्यामध्ये असलेल्या या कारला आधी गिऱ्हाईकच मिळत नव्हते. नंतर, व्यवहार झाल्यानंतर मात्र नाहक पोलीस चौकशीलाही सामोरे जावे लागल्यामुळे आॅडीमुळे दलालासह शोरूममालकाचीही डोकेदुखी वाढली आहे.ठाण्याच्या मीरा रोड आणि काशिमीरा भागातून अमेरिकन नागरिकांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याला अलीकडेच मुंबई विमानतळावरून ठाणे पोलिसांनी अटक केली. त्या वेळी या कॉल सेंटर घोटाळ्यातील पैशांतून त्याने खरेदी केलेल्या आॅडीची चौकशी त्याच्याकडे करण्यात आली. महागड्या गाड्या खरेदीची आवड असल्याने दिल्लीतील ‘रॅली मोटर्स’च्या चरणजित या दलालामार्फत विराटच्या नावावर असलेली ‘आॅडी आर ८’ची ७ मे २०१६ रोजी शॅगीने खरेदी केली. ही कार शॅगीचा अहमदाबाद येथील एक मित्र जिगर चव्हाण याने स्वत:ची कागदपत्रे दाखवून ५५ लाखांमध्ये घेतली. या ५५ लाखांमध्ये ४५ लाख रोख, तर १० लाखांची रक्कम शॅगीने आरटीजीएसमार्फत रॅली मोटर्सकडे जमा केली. त्याने जिगर या मित्रामार्फत पैसे दिले, पण योग्य कागदपत्रेच न दिल्याने ती त्याच्या नावावर न होता विराटच्याच नावावर राहिली. विराटने मूळ एक कोटी ८० लाखांची कार रॅली मोटर्स यांच्याकडे ५० लाखांमध्ये विकली. या व्यवसायात केवळ पाच लाखांचा नफा झाला असला तरी सिंग या दलालाकडे ती दोन वर्षांपासून धूळखात पडून होती. दोन वर्षांपासून तिची देखभाल दुरुस्ती तसेच खरेदी केलेल्या रकमेवरील व्याज गृहीत धरता हा व्यवहार आधीच तोट्यात गेला होता. शॅगीने खरेदीनंतर आरटीओच्या फॉर्मची पूर्तता केली नाही.- चरणजित सिंग याचीही चौकशी झाली. ठाणे पोलिसांनी त्याला पाचारण केल्यानंतर १७ मे रोजी तो आपला जबाब देण्यासाठी ठाण्यात आला होता. मुळात सेलिब्रेटीची गाडी म्हटले तर तिच्या खरेदीसाठी ग्राहक अक्षरश: उड्या मारतात. त्यामुळे सहसा त्रास होत नाही. पण, या कारच्या व्यवहारामुळे बरीच डोकेदुखी झाल्याची प्रतिक्रिया सिंगने ठाणे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सेलिबे्रटी क्रिकेटपटू विराट कोहलीची कार विकायची असल्यामुळे खरेदी करणाऱ्याच्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक होते. त्यामुळे आम्ही या व्यवहारात बारकाईने पडताळणी करण्यासाठी सागरकडे मूळ कागदपत्रांची मागणी केली होती. एखाद्या गिऱ्हाईकाने बाहेर काय केले, याची फारशी पडताळणी होत नसते. - चरणजित सिंग, दलाल, दिल्ली