ठाणे : आभासी चलनाची निर्मिती करून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आरोपीच्या पोलीस कोठडीत मंगळवारी तीन दिवसांची वाढ करण्यात आली.ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील ‘बिझनेस ओरिएंट पार्क’ येथील ‘फ्लिनस्टोन ग्रुप’चा सूत्रधार अमित लखनपाल आणि त्याच्या सहकाºयांनी आभासी चलनात (क्रिप्टोकरन्सी) गुंतवणूक करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्लीतील प्रवीण अग्रवाल यांनी ४ जून रोजी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ कडे केली होती. या टोळीतील कौसा येथील आरोपी तहा हाफीझ काझी याला पोलिसांनी ४ जून रोजी अटक केली होती.त्यानंतर त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाचा तपास पूर्णत: तांत्रिक स्वरूपाचा आहे. आरोपींनी कुणाकुणाकडून किती रुपयांची गुंतवणूक केली, त्यांचा ठावठिकाणा काय आहे, अशा अनेक मुद्यांचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयास केली.न्यायालयाने या प्रकरणातील सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी केलल्या मागणीनुसार, आरोपीची अधिक चौकशी करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी तीन दिवसांनी वाढवली.
आभासी चलन घोटाळा; आरोपीच्या कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 6:42 AM