ठाणे : ग्लोबल कोविड सेंटरमधील स्टाफ नर्सकडे शरीरसुखाची मागणी केल्याबद्दल ठाणे महापालिकेतील विशाखा समितीने उपायुक्त डॉ. विश्वनाथ केळकर यांना एक लाखांचा दंड ठोठावला आहे. समितीने आपला चौकशी अहवाल महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द केला. त्या अहवालात नेमके काय निष्कर्ष काढण्यात आले, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
ठाणे महापालिकेचे उपायुक्त केळकर यांच्याकडे ग्लोबल कोविड सेंटरचा कारभार सोपविण्यात आला होता. जुलै महिन्यात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाणे महापालिकेत येऊन या संपूर्ण प्रकरणात आरोप केला होता. रुग्णालयात जून २०२० रोजी पीडित स्टाफ नर्सची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तिचे काम बघून तिला असिस्टंट मेट्रेन म्हणून बढती दिली. मात्र वर्षभरातच कागदपत्रे योग्य नसल्याचे कारण देत तिला कमी करण्यात आले. या नर्सकडे पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी शरीरसुखाची मागणी केली होती. त्यास तिने नकार दिल्यामुळेच या नर्सला कामावरून कमी करण्यात आले, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. महापालिकेतील विशाखा समितीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू होती. पीडित नर्सने केळकर यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशाखा समितीची चौकशी पूर्ण झाल्यांनतर डॉ. केळकर यांना समितीने एक लाखांचा दंड केल्याची माहिती पालिकेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. समितीने या प्रकरणातील चौकशी अहवाल तयार केला असून, तो महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना सादर केला आहे. परंतु या अहवालात नेमके काय निष्कर्ष काढण्यात आले आहेत, नेमका दंड कशामुळे लावला व तो कोणत्या आधारे निश्चित केला आहे, याबाबत प्रशासनाने गुप्तता ठेवली आहे.
महिलांच्या शोषणाबाबतच्या अनेक प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पांघरुण घालण्याकडे कल असतो. अनेकदा महिलांवर तक्रार मागे घेण्याकरिता दबाव टाकला जातो. मात्र ठाणे महापालिकेने हे प्रकरण धसास लावल्याबद्दल महिला कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
.........
वाचली