कल्याण : तळोजा कारागृहात आरोपी विशाल गवळीने रविवारी पहाटे आत्महत्या केली. यामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असतानाच दुसरीकडे माझा १०० किलो वजनाचा भाऊ टॉवेलने कसे लटकवून घेऊन आत्महत्या करू शकतो, असा सवाल विशालच्या बहिणीने उपस्थित केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विशालच्या बहिणीने आत्महत्येसाठी पीडित मुलीच्या कुटुंबालाही जबाबदार धरले आहे. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालातून विशालच्या मृत्यूचे नेमके काय कारण समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विशालचे वकील संजय धनके यांनीदेखील ही आत्महत्या नाही, त्याला कारागृहात मारले गेले आहे, असा आरोप केला.
न्यायालयात केला होता अर्ज
विशालने मला धोका आहे, असे सांगितले होते. त्यामुळे न्यायालयात अर्ज करून अक्षय शिंदेसारखे विशाललाही मारतील, असे सांगितले होते.
खटल्यासंदर्भात मी विशालशी बोललो तेव्हा त्याने माझा गुन्ह्याशी संबंध नाही, असे तो म्हणाला होता. त्याने मला बरीच काही माहिती दिली होती, असे धनके यांनी सांगितले.
विशालला न्यायप्रक्रिया पूर्ण करून फाशी देणे उचित होते; पण त्याने केलेल्या आत्महत्येमुळे पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला आहे. मात्र, ज्या पद्धतीने हा न्याय मिळाला आहे, तो अपेक्षित नव्हता. -दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हाप्रमुख, उद्धवसेना