ठाणे : प्रसिद्ध मराठी कवी विष्णू सूर्या वाघ यांच्या स्मरणार्थ सलग 12 तासांचे "काव्यरोंबाट" हा कवितेचा कार्यक्रम 5 एप्रिल रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयात महाराष्ट्रातील दिग्गज कवी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला आवर्जून सुप्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर, सुनील बर्वे, किशोर कदम, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील लोकप्रिय साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रथमच नववर्ष स्वागत यात्रेत पुलंची जीवंत व्यक्तीचित्र साकारणारा रथ असणार आहे.
यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष प्रा विद्याधर वालावलकर, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, अक्षर चळवळीचे संयोजक अरुण म्हात्रे, विष्णू सुर्या मित्र परिवारचे सुधाकर चव्हाण, गंधार कला संस्थेचे अध्यक्ष प्रा मंदार टिल्लू, मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यवाह अनिल ठाणेकर, कार्यकारिणी सदस्य दुर्गेश आकेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. अलिकडेच अकाली दिवंगत झालेले गोव्यातील प्रसिद्ध कवी, गोव्यात मराठी राज्यभाषेचा आग्रह धरणारे, मराठी कोकणी चे समन्वयक, नाटककार, गोमंतकचे माजी संपादक, एक फर्डे वक्ते आणि एक सर्वपक्षीय मित्र हे ठाण्याचेही मित्र होते. काही काळ त्यांनी ठाण्यातही वास्तव्य केले होते. त्यांच्या द्वितीय मासिक स्मृतीदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे, अक्षर चळवळ प्रकाशन आणि विष्णू सूर्या मित्र परिवार यांच्या वतिने दि.5 एप्रिल रोजी संग्रहालयाच्या सभागृहात सकाळी 9 ते रात्री 9 ह्या वेळात "काव्यरोंबाट" हा अखंड काव्यवाचनाचा 12 तासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या "काव्यरोंबाट " या दिवसभराच्या कार्यक्रमात मु पो कविता, पार्कातल्या कविता, क कोलाज कवितेचा, गझल तुझी नि माझी तसे ठाण्यातील कविता सखी मंच आणि कविता कॅफे आदी काव्यगट सहभागी होत आहेत.
महाराष्ट्राचे प्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रथमच 6 मार्च रोजी गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेत पुलंची व्यक्तीचित्र साकारणारा चित्ररथ साकारण्यात येणार आहे. मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे व गंधार कला संस्थेचे अध्यक्ष प्रा. मंदार टिल्लू, सेक्रेटरी बाळकृष्ण ओवळेकर, खजिनदार वैभव पटवर्धन यांच्या संस्थेचे स्वरा जोशी, पूर्वा सावंत, वेदांत आपटे, श्रेयश थोरात, अद्वैत टिल्लू, अनिकेत हेर्लेकर, वेदांत जकातदार, शौनक करंबेळकर हे बालकलाकार साकारणार आहेत. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त या वर्षापासून आता दरवर्षी नववर्ष रथयात्रेत अशा आगळ्यावेगळ्या रथयात्रेत सहभाग नोंदविला जाणार आहे.