पंकज पाटील
अंबरनाथ : गाजावाजा न करता राजकीय व्यक्ती वाढदिवसाचा खर्च एखाद्या चांगल्या कामासाठी वापरण्याचा चांगला ट्रेंड सध्या दिसत आहे. त्याची प्रचीती अंबरनाथमध्येही आली. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुग्रह आश्रमातील मुलींसाठी हक्काचे वसतिगृह उभारून दिले आहे. दोन मजली इमारतीमुळे या आश्रमशाळेतील मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सामाजिक उपक्रमातून अनाथाश्रमातील मुलींसाठी हक्काचे वसतिगृह उभारून देण्याचे आश्वासन दिले होते. चौधरी यांनी वर्षभराच्या आतच अंबरनाथ फणशीपाडा भागातील अनुग्रह आश्रमात दोन मजली आरसीसी बांधकामाचे वसतिगृह बांधून दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचे काम सुरू करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात एक मजली आणि नंतर ही इमारत कमी पडेल म्हणून पुन्हा त्यावर दुसराचा मजला चढवण्यात आला. आश्रमशाळेत सर्व सुविधायुक्त असे वसतिगृह उभारण्यात आल्याने या ठिकाणी असलेल्या अनाथ मुलींची गैरसोय दूर झाली आहे. या आश्रमाची सुरुवात २६ वर्षांपूर्वी झाली होती. आज या आश्रमशाळेत ९०हून अधिक विद्यार्थी असून त्यातील अनेक विद्यार्थी हे याच आश्रमात वास्तव्यास आहेत. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय या आश्रमात करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे संस्थेच्या प्रमुख लिना पॉल यांनी चौधरी यांच्याकडे वसतिगृहाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. चौधरी यांनी थेट या ठिकाणच्या वसतिगृहाच्या जागेवर नवी इमारत उभारून दिली आहे. दोन मजली इमारतीत आता अनेक मुलींच्या निवाऱ्याची सोय झाली आहे.अंबरनाथ एमआयडीसी भागात असलेल्या या आश्रमातील अनाथ मुलांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या निवाºयाची सोय वाढवण्याची गरज होती. चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या वसतिगृहाचे उद्घाटन केले. सोबत त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचे काम सुरू केले आहे.आश्रमातील मुलीची गैरसोय दूर करण्याच्या हेतूने या ठिकाणी दोन मजली वसतिगृह उभारून दिले आहे. आपला आर्थिक हातभार या कामात लागला त्याचा आनंद महत्त्वाचा आहे. या कामासाठी आपल्या कुटुंबाचीही साथ लाभल्याने तो आनंद द्विगुणित झाला आहे.- सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष