मीरारोड (ठाणे) - शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नीच्या नावाने खोटी ओडियो क्लीप व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांचा शोध पोलीस घेत असताना आता राणे कुटुंबीयांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षय कुमार येऊन भेटुन गेल्याची अफवा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अक्षयने राणे कुटुंबीयांस 9 लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचेही या संदेशात म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजरचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. लोकांनी विचार तसेच खात्री न करता असले संदेश व्हायरल करुन मन:स्ताप देऊ नयी, अशी विनवणी कुटुंबीयांनी केली आहे.मंगळवारी 7 आॅगस्ट रोजी पहाटे काश्मीरमधील सीमेवर घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना कंठस्रान घालताना मेजर कौस्तुभ शहीद झाले. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या मेजर यांच्या पश्चात वृध्द आई - वडिल, शिकत असलेली बहिण, पत्नी व अवघा 2 वर्षांचा मुलगा आहे. मेजर कौस्तुभच्या वीरमरणाबद्दल कुटुंबीयांना अभिमान आहे. तेवढंच घरातला एेकमेव तरुण गेल्याचं दुख:ही खूप मोठे आहे. 9 आॅगस्ट रोजी मेजर यांच्या अंतिम यात्रेवेळी हजारो नागरिकांनी सहभागी होऊन देशाच्या सुपुत्राला मानवंदना दिली. पण त्याच्या आदल्या दिवसापासून वीरपत्नीच्या नावाने मनोगत म्हणून निंदाजनक ओडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेक नागरिकांनी क्लीपची सत्यता व वस्तुस्थितीचे भान न पाहताच क्लीप फॉरवर्ड केली. अखेर समता नगर पोलीसा ठाण्यात तक्रार झाली . मीरारोड व ठाणे ग्रामीन पोलीसांनी देखील गांभीर्याने दखल घेत क्लीप खोटी असल्याने फॉरवर्ड करु नये असं आवाहन केले. मेजर कौस्तुभ यांची मामी वर्षा जाधव यांनी देखील नागरीकांना आवाहन करत मन:स्ताप होईल व शहिदाच्या कुटुंबियांचा अवमान होईल असं करु नका सांगितले. काही ठिकाणाहून शहिदाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी पैसे गोळा केले जात असल्याचे समजल्याने त्याबद्दलही कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक , व्हॅट्सअॅपवर अभिनेता अक्षय कुमार राणे यांच्या कुटुंबियांना मध्यरात्री 3 च्या सुमारास भेटून गेला, व त्याने शहिद पारीवारास 9 लाखांचा धनादेश दिला. लहानग्या अगस्त्यच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवल्याचे मॅसेज सर्वत्र व्हायरल झाले आहेत. कुठलीही खात्री न करता तसेच पहाटे 3 वाजता अक्षय कुमार कशाला येईल, असा साधा विचारदेखील न करता असले मॅसेज फॉरवर्ड केले जात असल्याबद्दल शहिदाच्या कुटुंबीयांनी खेद व्यक्त केला आहे. चुकीचे , गैरसमज पसरवणारे तसेच खोटे मॅसेज व्हायरल करु नका, असे आवाहन कुटुंबीयांकडुन पुन्हा करण्यात आले आहे.
शहीद कौस्तुभ राणेंच्या कुटुबीयांना अक्षय कुमार भेटला? जाणून घ्या 'व्हायरल सच'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 5:18 PM