कल्याण : राज्यातील शेतकऱ्यांच्या तुरीची राज्य सरकारने ‘नाफेड’मार्फत खरेदी करून त्यास हमी भाव द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण जिल्ह्यातर्फे सोमवारी सरकारचे अधिकारी म्हणून कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी त्यांना प्रतीकात्मक तूरही भेट देण्यात आली. आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. धानउत्पादक शेतकरी हमी भाव मिळत नसल्याने हवालदिल झाले आहे. परंतु, सरकार आपल्या नकारात्मक भूमिकेवर ठाम राहिल्याने लाखो क्विंटल तूर खरेदीविना बाजारात व शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे, याकडे लक्ष वेधताना सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांची तूर ५,५०० रुपये प्रतिक्विंटल हमी भावाने खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली. राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून सर्व विरोधी पक्षांनी सरकारकडे शेती मालाला हमी भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, यासाठी सातत्याने मागणी केली आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत नसल्याबाबत या वेळी नाराजीही व्यक्त करण्यात आली. आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, जे.सी. कटारिया, राजेंद्र नांदोस्कर आदींसह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कल्याणच्या तहसीलदारांना दिली प्रतीकात्मक तुरीची भेट
By admin | Published: May 02, 2017 2:08 AM