कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची दुरवस्था व आर्थिक डबघाईचे चित्र ‘लोकमत’ने ११ जुलैच्या अंकात ‘आॅन दी स्पॉट’द्वारे मांडले होते. त्याची दखल घेत केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी व आयुक्त ई. रवींद्रन शुक्रवारी संयुक्त दौरा करून दुरवस्थेचा आढावा घेणार आहेत.उत्पन्न व खर्चात प्रचंड तफावत असताना बसथांब्यांची झालेली दुरवस्था, रिक्षातळांचे अतिक्रमण, उपक्रमातील घोटाळे, कार्यालयांची दुरवस्था, आगारांत विजेअभावी अंधाराचे साम्राज्य या बाबींवर वृत्तामध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या समस्यांची दखल घेत शुक्रवारी रवींद्रन व चौधरी सायंकाळी ५ वाजता आगारांची पाहणी करणार आहेत. वसंत व्हॅली, गणेशघाट आणि खंबाळपाडा आगारांसह डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील नियंत्रण कक्ष व डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक परिसराचा संयुक्तपणे दौरा केला जाणार आहे. आगारांमधील दलदलीचे साम्राज्य पाहता तेथे खडीकरण व डांबरीकरणाच्या निविदा काढल्या आहेत. लवकरच या कामांसह विद्युतीकरणाची कामे केली जातील, अशी माहिती चौधरी यांनी दिली. डोंबिवलीतील आगारांत डिझेलपंप बसवण्याचे कामही केले जाणार आहे. शहरातील अंतर्गत बस वाहतुकीचे संचालन तेथूनच होईल. त्यामुळे वेळ व इंधनाची बचत होईल, असे त्यांनी सांगितले. सोमवारी माजी सभापती राजेश कदम यांनी डिझेल टँकची झाकणे गायब झाल्याने मोठ्या प्रमाणावर डिझेल गळती होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
केडीएमटी आगाराचा आज पाहणी दौरा
By admin | Published: July 15, 2016 1:28 AM