भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये दहिसर ते कासारवडवली दरम्यान नियोजित मेट्रो प्रकल्प मीरा-भार्इंदर शहरामार्गे विस्तारित केला आहे. त्याच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी एमएमआरडीएच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत मेट्रो मार्गाची पाहणी केल्याचे शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांनी सांगितले. नियोजित मेट्रो मार्ग काशिमिरा वाहतूक बेटापासून छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रस्तावित आहे. हा मार्ग पुढे थेट भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानापर्यंत जाणार आहे. त्याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिल्याने तांत्रिक आढावा घेतला जात आहे. फेब्रुवारीमध्ये एमएमआरडीए आयुक्त यू. पी. एस. मदान व अतिरीक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी कारशेडसाठी पुरेशा जागेची पाहणी केली होती. त्यावेळी पालिकेकडुन चार जागा प्रस्तावित केल्या होत्या. या जागा सीआरझेड बाधित असल्याचे निदर्शनास आले. तरीदेखील राज्य सरकारच्या स्तरावर पर्यावरण विभागाकडून त्याला मान्यता मिळण्याची अपेक्षा पालिकेने व्यक्त केली आहे. या जागांच्या चाचपणीसह मेट्रो मार्गातील संभाव्य अडथळे व त्यावरील उपयांचा आढावा घेण्यासाठी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराला भेट दिली. त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (प्रतिनिधी)
एमएमआरडीएची मेट्रो मार्गाला भेट
By admin | Published: March 08, 2017 4:15 AM