ठाणे : नवी मुंबई ते ठाणे (विटावा) मार्गावर रेल्वेपुलाखालील दुरुस्तीचे काम आणखी दोन दिवस चालणार आहे. त्यामुळे या भागात होणारी वाहतूककोंडी ही सोमवारपर्यंत राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरवर्षी पावसाळ्यात विटावा पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी याठिकाणी ठाणे महापालिकेच्या वतीने खड्डा करून रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरून नवी मुंबई ते ठाण्याकडे जाणारी जड वाहने ही ऐरोली, मुलुंड, आनंदनगर ते कोपरीमार्गे वळवण्यात आली आहे. ठाण्यातून नवी मुंबईकडे विटावामार्गे जाणारी वाहने आता विटावा मार्गाऐवजी गोल्डन डाइजनाका, कॅडबरी कंपनी, तीनहातनाका, कोपरी आणि त्यानंतर ऐरोलीमार्गे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी वाहतूक विभागाने अधिसूचना काढली आहे. दरम्यान, या मार्गावर इतरही वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. गेले दोन दिवस विटावा पुलाखाली सिमेंटीकरण केल्यानंतर रविवारी आणि सोमवारी त्याठिकाणी पाणी मारून क्युरिंग केले जाणार आहे. त्यानंतर, हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका सूत्रांनी दिली.