ठाणे : विठ्ठलरखुमाईची झालेली पूजाअर्चा, मंदिरात भक्तांची गर्दी, ठिकठिकाणी विशेषत: शाळकरी मुलांच्या निघालेल्या दिंड्या आणि विठुनामाचा जयघोष... अशा उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथसह जिल्ह्यात शुक्रवारी आषाढी एकादशी साजरी झाली. शहाड येथील प्रतिपंढरपूर मानल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली.जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विठ्ठलरखुमाईच्या मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात तसेच दमाणी इस्टेट परिसरातील विठ्ठलरखुमाईच्या मंदिरात, मुख्य बाजारपेठ परिसरातील विठ्ठल मंदिरात, खोपट सिद्धेश्वर तलाव येथील मंदिरात दिवसभर भक्तांच्या रांगा होत्या. बाजारपेठेतील मंदिरात खासदार राजन विचारे यांनी सपत्नीक दर्शन घेतले. अनेक शाळांमध्ये दिंड्या काढण्यात आल्या. पारंपरिक वेश परिधान करून सजलेले चिमुकले वारकरी सर्वांचे आकर्षण बनले होते. आनंद भारती समाजाच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप करण्यात आला. टिटवाळा दिंड्यांनी गजबजले : टिटवाळा : टिटवाळा येथील विठ्ठलरु क्मिणी मंदिरात पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. परिसरातील गावांतून अनेक दिंड्या दाखल झाल्याने टिटवाळा गजबजले होते. उशीद, फळेगाव, हाल व रुंदे या गावांतील नागरिकांनी उशीदवरून पायी दिंडी काढली. या दिंडीची शहाड येथील विठ्ठल मंदिरात सांगता केली. काकड आरती करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. विविध भजनी मंडळांनी भजने सादर केली. तिरकाळीश्वर मठात गर्दीशिरोशी : मुरबाडमधील खापरी, कामतपाडा येथील तिरकाळीश्वर मठात भाविकांनी गर्दी केली होती.मुंब्य्रात ठामपाची जनजागृती मोहीम : मुंब्रा : आषाढी एकादशी मुंब्य्रात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील रेल्वे स्थानकाजवळील प्रमुख बाजारपेठेतील पुरातन विठ्ठलरु खुमाई मंदिरात पहाटे विशेष महापूजा, अभिषेक-पूजा करण्यात आली. ठामपाने मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांना आरोग्यविषयक पत्रके वाटून जनजागृती मोहीम राबवली. दिवसभर भजन, कीर्तन, हरिपाठ हे धार्मिक कार्यक्र मदेखील आयोजित केले होते. कोळसेवाडीत आषाढी एकादशी साजरीकोळसेवाडी : कल्याण (पूर्व), चिकणीपाडा येथे तपोनिधी बाळासाहेब फणसे स्वामीप्रणीत स्वानंद अध्यात्म ज्ञानपीठ या संस्थेच्या वतीने आषाढी एकादशी सोहळा संपन्न झाला.सम्राट अशोक हायस्कूल, रॉयल हायस्कूल व नूतन ज्ञानमंदिरातील शेकडो विद्यार्थ्यांच्या लेझीम, बॅण्ड पथकांसह मंदिरात दिंडी आणली. डोंबिवली-सागर्ली, पाथर्ली, घर्डा सर्कल, बी केबिन ठाणे, वडवली, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर येथे संयुक्त दिंड्या वाजतगाजत मंदिरात आल्या. काटेमानिवली येथील मंदिरातही भाविकांनी दर्शन घेतले.