- जान्हवी मोर्येडोंबिवली - विद्यार्थ्यांचा करिअरकडील कल जाणून घेण्यासाठी कलचाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना काय करावे, कोणती शाखा निवडावी, यासाठी त्याचा फायदा होतो. मात्र, कलचाचणीच्या निष्कर्षाकडे ५० टक्के पालक आणि विद्यार्थी दुर्लक्ष करतात. पारंपरिक पद्धतीनेच करिअरनिवडीकडे त्यांचा कल आहे. त्यामुळे कलचाचणीबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सजगता आणि गांभीर्य वाढणे आवश्यक आहे, असे मत विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी व्यक्त केले.पंडित म्हणाले की, करिअरचे अनेक पर्याय आहेत; मात्र माहितीअभावी पालक आणि विद्यार्थी त्याबाबत द्विधा मन:स्थितीत असतात. त्यामुळे परिस्थितीजन्य कारणाअभावी कित्येकदा आवड आणि अभिक्षमता नसणाऱ्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रवेश घेत असल्याने त्यांना भविष्यात चाचपडावे लागते. विद्यार्थ्यांमधील वेगळेपण जाणण्यासाठी महाराष्ट्रातील दहावीच्या राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी दरवर्षी घेण्यात येते. यंदाच्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांमधील अभिक्षमता ओळखता येण्यासाठी अभिक्षमताचाचणीही घेतली जात आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आवडीचे क्षेत्र, त्यासाठी आवश्यक क्षमता या मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे जाणून घेतली जात आहे. मंडळातर्फे राबवला जाणारा हा चांगला उपक्रम असला, तरीही पालक आणि विद्यार्थी त्यांनी ठरवलेले करिअरच निवडतात, असेही त्यांनी सांगितले.नव्याने विकसित केलेल्या या कलचाचणीत कृषी, कला, वाणिज्य, ललित कला, आरोग्य, विज्ञान, तांत्रिक, गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रांमधील अभिरुचीचे मापन केले जाते. ही एक चांगली बाब आहे. आता कलचाचणी ही सर्वसमावेशक बनवली आहे. त्यामुळे पारंपरिक करिअरच्या वाटा सोडून विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रनिवडीला प्रोत्साहन मिळणार असल्याचे पंडित म्हणाले.नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गगरे म्हणाल्या की, राज्य मंडळाने विद्यार्थ्यांसाठी करिअरनिवडीसाठी एक चांगली संधी दिली आहे. पण, विद्यार्थी त्यात विचार करत नाही. विद्यार्थ्यांनी विचार करून पर्याय निवडले पाहिजेत. कलचाचणीसाठी दीड तास वेळ दिला आहे. विचारपूर्वक उत्तरे ते निवडू शकतात, पण बºयाचदा ते तसे करत नाहीत. बोर्डाचा निकाल येण्यापूर्वी कलचाचणीचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती येतो. यंदा कलचाचणीच्या अॅपवर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुटीत हे व्हिडीओ पाहता येतील. समुपदेशकांकडून मार्गदर्शनही घेता येईल.यंदा विविध क्षेत्रांची माहिती : सर्वोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक वीरेंद्र पाटील म्हणाले की, कलचाचणीनुसार ३० ते ३५ टक्के विद्यार्थीच करिअर निवडतात. आजपर्यंतच्या कलचाचण्या फार गांभीर्याने घेतल्या नाहीत. यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रांची माहिती दिली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना करिअर म्हणजे काय, हे नीट समजत नव्हते. विविध क्षेत्रांची माहिती दिली जात नव्हती. यंदा विविध पर्याय दिल्याने या वर्षापासून विद्यार्थी व पालकांचा कल वाढू शकतो. कलचाचणीच्या निकालानुसार ते करिअर निवडतील, असे ते म्हणाले.
कलचाचणीबाबत गांभीर्य आवश्यक, विवेक पंडित यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 3:10 AM