प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : महाराष्ट्र राज्य हे क्रांतीचे राज्य आहे त्यामुळे औद्योगीकरण वाढण्यासाठी नजीकच्या काळात व्यवसायाभिमुख शिक्षण हे शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग होणार आहे. येत्या काळात जागतिक कपन्यांशी टायअप होणार असून हे सरकार आल्यापासून परकीय गुंतवणूक भारतात आणणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याचा शासन पातळीवर निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात केसरकर बोलत होते. दरम्यान, उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट चे उदय सावंत यांनी केसरकर यांच्या समोर वाचल्या. त्यावेळी त्यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून आपल्या समस्या सोडवण्याचा शासन स्तरावर निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. केसरकर पुढे म्हणाले की, मराठी उद्योजक मोठा झाला पाहिजे. नोकरी शोधणारा न राहता नोकरी देणारा मराठी माणूस झाला पाहिजे. उद्योजकता तुमच्या मनात आहे. मात्र मराठी उद्योजक मोठा होण्यासाठी शासनाचे सहकार्य निश्चित मिळेल असे आश्वासन उपस्थित उद्योजकांना दिले. दोन कोटी वीस लाख विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असून. त्यांना नीट शिक्षण मिळते की नाही हे समजण्यासाठी विशेषत: दुर्गम भागांतील शाळांमध्ये आर्टीफिशियल इंटिलिजन्स कॅमेरा लावणार आहेत. त्यामुळे किती विद्यार्थी शाळेत शिकत आहे आणि शिक्षक शिकवत आहे की नाही हे त्या माध्यमातून समजेल. जगात चार ते पाच देश सोडले तर कुठेही इंग्रजी भाषा बोलली जात नाही. ज्या देशांची प्रगती झाली त्यांनी आपल्या देशातल्या विद्यार्थांना मातृभाषेतून शिक्षण दिले आहे. त्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगचे शिक्षण तर पुढच्या वर्षीपासून मेडिकलचे शिक्षण मराठीतून देण्यास आपण सुरू केले असल्याचे ते म्हणाले.