लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे झाली तरीही अद्याप खरे सूत्रधार मोकाट फिरत असून, तपास कुर्मगतीने सुरू आहे. डॉ. दाभोलकर यांच्यानंतरही राज्यात समाजसुधारक व विचारवंतांचे खून झाले आहेत. असे भ्याड हल्ले करणाऱ्यांना वचक बसावा आणि समाजसुधारकांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा अस्तित्वात यावा, या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), डोंबिवली शाखेतर्फे संवैधानिक पद्धतीने आणि शांततेच्या मार्गाने मूक निदर्शने करण्यात आली.
अंनिसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शुक्रवारी भरपावसात पश्चिमेला रेल्वे स्थानक परिसरात जमले होते. कोरोनाकाळातील सर्व नियम पाळून हे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. दाभोलकर तसेच अनेक समाजसुधारकांच्या झालेल्या निर्घृण हत्येचा तसेच कूर्मगतीने सुरू असलेल्या तपासाचा या वेळी निषेध करण्यात आल्याची माहिती निशिकांत विचारे यांनी दिली.
त्या वेळी अंनिसच्या राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, राज्याच्या कायदा विभागाच्या सहसचिव ॲड. तृप्ती पाटील, ठाणे जिल्हा पदाधिकारी परेश काठे, मुकुंद देसाई तसेच डोंबिवली शाखा कार्याध्यक्ष अशोक आहेर, संतोष पाटील, शुभांगी अडारकर, देवयानी गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो आहे.
----------