ठाणे : मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. या दिवसाचे औचित्य साधून "गुढीपाडवा, मतदान वाढवा" हा उपक्रम ठाणे विधानसभा मतदारसंघ ,स्वीप पथक यांच्या संकल्पनेतून राबविला. गुढीपाडवा या सणाचे विशेष आकर्षण असते. त्यानुसार ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण-तरुणी व नागरिक ठाण्याच्या पाडव्याच्या रॅलीत सहभागी हाेते. गुढीपाडव्यानिमित्त विविध प्रकारच्या शोभायात्रेचे (रॅली) आयोजन करण्यात आले. यावर्षी ठाणेकरांना पाडवा रॅलीत मतदान जनजागृतीचे रंग पाहायला मिळाले. पहाटे ६ वाजल्यापासूनच संपूर्ण स्वीप पथक उपस्थिती लावून या ठिकाणी रॅलीमध्ये एकूण ४७ चित्ररथ सहभागी करण्यात आले हाेते.
या रॅलीमध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान जनजागृतीकरिता स्वीप पथकाचे चित्ररथ शोभायात्रा रॅली सहभागी झाले. या चित्ररथावर ठाणे विधानसभा मतदारसंघाचे बॅनर पोस्टर होते. पूर्ण चित्ररथ फुलांनी सजविला होता व उत्तम असे प्रेरणात्मक सजावट करण्यात आली होती. चित्ररथावर मतदान जनजागृती संबंधित सोप्या भाषेत समजतील, असे प्रेरक संदेश प्रदर्शित करण्यात आले होते. मतदान जनजागृती चित्ररथ रॅलीवर मतदान जनजागृती संबंधित सुंदर गाण्यांची मैफल सुरू होती. रथावर विविध सांस्कृतिक वेशभूषा केलेले विद्यार्थी होते. सर्वाना समान मताधिकार आहेत व कोणताच घटक मतदानापासून वंचित राहणार नाही, हा प्रेरक संदेश हे विद्यार्थी त्यांच्या वेषभूषेतून चित्ररथाद्वारे देत होते.
भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे आणि या एकतेमधून मतदानादिवशी प्रत्येक नागरिकाने मतदान अधिकार बजावला पाहिजे, प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे संदेश उपस्थित नागरिकांपर्यंत पोहचविण्यात स्वीप पथक यशस्वी ठरले. या चित्ररथ रॅलीमध्ये "मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार", आणि "भविष्य घडवायला आम्ही आज आलो.. तुम्ही सुद्धा २० मे ला मतदानाला या..", अशा प्रकारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. चित्ररथ रॅलीमध्ये महत्वाचा वेगळा उपक्रम म्हणजे या चित्ररथ रॅली पाहणाऱ्या व सहभागी होणाऱ्या नागरिकांना "मी मतदान करणारंच..... आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज रा.." या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान २० मे असे दर्शविणारे माहितीपत्रकाचेही वितरण करण्यात आले. तलावपाळी येथून सकाळी ७ वाजता निघालेल्या रॅलीचा चरई, हरीनिवास मार्गे व नौपाडा मार्गे गावदेवी मैदान येथे सकाळी ११:३० वाजता समारोप करण्यात आला.