ठाणे/वसई : ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले खरे, पण आघाडीतील डावखरेंचे विरोधक आणि महायुतीतील फाटकांच्या विरोधकांत मतदान होईपर्यंत चांगलीच चलबिचल होती. निकालावेळी काही दगाफटका घडल्याचे स्पष्ट झाले, तर आपल्यावर बालंट नको म्हणून काहींनी आपापल्या परीने फोटो काढण्याचा, काही खुणा करण्यासाठी पेनचा वापर करण्याचा प्रयत्न केला खरा; पण निवडणूक आयोगाने मोबाइल, पेनसारख्या साधनांना मज्जाव केल्याने ते हिरमुसले. आपण आपल्याच उमेदवाराला मत दिले, आदेश पाळले, राजकीय भवितव्य पणाला लावलेले नाही, हे उमेदवाराला-नेत्यांना समजावे, यासाठी काहींनी मतदान केंद्रावर मोबाइल नेण्याचा अट्टहास केला. परंतु, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला. फाटक पडले तर त्याचे खापर त्यांच्या विरोधी गटावर आणि डावखरे पडले तर त्याचे खापर हे त्यांच्या विरोधी गटावर फोडले जाणार, हे नक्की असल्याची चर्चा मतदानाच्या परिसरात रंगली होती. त्यामुळे मत दिले तरी टेन्शन आणि उमेदवार पडला तर अधिकच टेन्शन, या विवंचनेत काही मतदार दिसून आले.विधान परिषदेच्या एका जागेसाठी प्रथमच तुल्यबळ लढत होते आहे. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेकडे अधिक मते असतानाही त्यांनादेखील काहीसे टेन्शन होते. त्याच वेळी राष्ट्रवादी गाफील नसल्याने हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केल्याने, त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. छोटे पक्ष, अपक्ष यांची भूमिका शेवटच्या दोन दिवसांपर्यंत तळ्यात-मळ्यात होती. त्यांच्या पाठिंब्याबाबत एकीकडे डावखरे दावा करत होते, तर सत्तारूढ पक्षासोबत ते हमखास असतील, असा शिवसेनेचा दावा होता. असे असले तरी या दोन्ही उमेदवारांविरोधात दोन्ही पक्षांत काही गट सक्रिय असल्याने किंबहुना दोनही पक्षांत त्यांच्या विरोधातील गट प्रभावी असल्याने या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. त्यांच्याविरोधात असलेल्या गटातील नगरसेवकांची मात्र मतदान केंद्राच्या ठिकाणी फार चलबिचल सुरू होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी फाटक यांचा जेव्हा पराभव झाला होता, तेव्हा त्याचे भोग त्यांच्या विरोधात असलेल्या पदाधिकाऱ्यांना भोगावे लागले होते. पक्षाने त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. (प्रतिनिधी) च्ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधानपरिषदेत निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानात वसईतील १२० पैकी ११९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वसई विरार शहर विकास आघाडीचे नगरसेवक अमेरिकेत असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत डावखरे आणि शिवसेनेकडून रविंद्र फाटक मैदानात उतरले आहेत. वसई तालुक्यातून वसई विरार महानगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून एकूण १३५ मते आहेत. च्यातील ५ शिवसेना आणि १ भाजपा वगळता सर्वच बहुजन विकास आघाडीचे मतदार होते. यातील १२० मतदारांसाठी वसईच्या तहसील कचेरीत मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारपर्यंत १२० पैकी ११९ जणांनी मतदानाचा ह्नक बजावला. वसई विरार विकास आघाडीचे नगरसेवक महेश पाटील अमेरिकेत असल्याने मतदानाला हजर राहू शकले नाहीत. च्जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांसाठी पालघर येथे व्यवस्था करण्यात आली होती. मतदानात दगाफटका होऊ नये यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी खबरदारी घेतली होती. शिवसेना-भाजपा नगरसेवकांना गोवा येथे पाठवण्यात आले होते. गुरुवारी दुपारी गोव्याला असलेल्या सर्व नगरसेवकांना मुंबई-अहमदाबाद हायवेवर असलेल्या दोन रिसॉर्टमध्ये ठेवले होते. यावेळी वसई आणि पालघर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले होते. च्सेना गटनेते धनंजय गावडे यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. दुसरीकडे, बविआचे नगरसेवक शहरातच होते. महापौर प्रवीणा ठाकूर यांच्यासह ११४ नगरसेवकांनी मतदान केले. आ. हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांच्यासह बविआचे नेते मतदान केंद्रानजीक तळ ठोकून बसले होते. तसेच आ. निरंजन डावखरे यांनीही वसईत तळ ठोकला.
मतदान केले; पण चलबिचल सुरूच
By admin | Updated: June 4, 2016 01:18 IST