ठाणे : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांनी आज स्वत: ठाण्यातील वर्तकनगर आणि एनकेटी महाविद्यालयासमोरील काही सोसायट्यांमध्ये जाऊन तेथील नागरिकांच्या भेटी घेतल्या तसेच मतदार नोंदणीचे काम कसे चालले आहे ते पाहिले. एवढेच नव्हे तर आपला ताफा मध्येच थांबवून त्यांनी कोकणीपाडा नजीकच्या झोपडपट्टीत जाऊन तेथील रहिवाशांनी मतदार नोंदणी केली आहे का ते तपासले व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.आज मंगळवारी अश्विनीकुमार यांनी ठाण्याला भेट दिली. प्रारंभी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील नवीन मतदार नोंदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. तसेच केंद्रस्तरीय अधिका-यांनी घरोघरी भेट देऊन मतदार नोंदणीवर जास्तीतजास्त भर द्यावा असे सांगितले. जिल्ह्यातील शासनाच्या कार्यालयांनी लोकशाहीच्या या पवित्र कार्यासाठी अधिकारी उपलब्ध करून दिलेच पाहिजे असेही ते म्हणाले.यानंतर त्यांनी काही सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मतदान अधिकारी कशा नोंदणी करतात ते पाहण्याचे ठरविले. वर्तकनगर आणि एनकेटी महाविद्यालयासमोरील काही सोसाट्यांमध्ये ते स्वत: जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या समवेत शिरले. यावेळी अधिका-यांना येणा-या अडचणी समजावून घेतल्या तसेच रहिवाशांशी देखील चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्र म जिल्ह्यात सुरु असल्याबाबत माहिती दिली.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात एकूण ५ हजार ६८१ मतदान केंद्रे असून ४ हजार ६८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपलब्ध झाले आहेत. यात २ हजार ३९९ शिक्षक आहेत असे त्यांनी सांगितले. सर्व मतदार नोंदणी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत २१ हजार १३१ अर्ज स्वीकारण्यात आले असल्याची माहिती यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मतदार नोंदणी वाढवावी जिल्हा उपनिबंधकांनी सहकारी संस्थांच्या पदाधिका-यांना यासंदर्भात सुचना द्याव्यात अशा सुचना अश्विनीकुमार यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपनिबंधक शहाजी पाटील, प्रांत अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील आदि उपस्थित होते.
सोसायट्यांसह झोपडपट्टीत जाऊन राज्य मुख्य निवडणूक अधिका-यांनी केली मतदार नोंदणीची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 8:41 PM