उल्हासनगर : स्वतःला कट्टर शरद पवार समर्थक म्हणून घेणारे माजी आमदार पप्पु कलानी यांनी आमदार कुमार आयलानी यांच्या खांद्याला खांदा लावून शिंदेसेनेच्या शिवधनुष्य चिन्हाचा प्रचार केल्याने, शहरातील मतदान टक्का वाढल्याचे बोलले जात आहे. कलानी व आयलानी यांच्या एकत्र येण्यामुळे सिंधी समाज मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र होते.
उल्हासनगर शहर हे उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विभागले आहे. उल्हासनगर मतदारसंघात शहरातील पश्चिम भाग व वरप व कांबा या गावाचा समावेश होतो. मतदारसंघातील एकून २ लाख ५७ हजार ३६७ मतदारा पैकी १ लाख ३१ हजार ५०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदानाची टक्केवारी प्रथमच ५१.१० टक्क्यांवर गेली आहे. यापूर्वी कधीही ५० टक्के मतदान मतदारसंघात झाले नाही. गेल्या लोकसभा निवडणुकी पेक्षा ५ ते ६ टक्के मतदानात वाढ झाली असून वाढलेली टक्केवारी कोणाच्या माथ्यावर पडेल. याची चर्चा शहरात रंगली आहे.
आयलानी व कलानी यांनी शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करून सिंधी मतदारांना बाहेर काढल्याने, टक्केवारीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. भाजपचे आमदार कुमार आयलानी, पक्षाचे पदाधिकारी, माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी टीम, स्थानिक साई पक्ष, रिपाइं आठवले गट, कवाडे गट यांच्यासह मनसे, अजित पवार गट आदींनी महायुतीचे श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराची धुरा प्रामाणिकपणे वाहिल्याने, मतदान टक्केवारीत वाढ झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागदर्शनखाली व श्रीकांत शिंदे त्यांचा महायुतीतील प्रत्येक पक्ष नेत्या सोबतचा संवाद व त्यांच्यावर वॉच असल्याने मतदान टक्का वाढला. असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. आयलानी व कलानी एकत्र नसतेतर, सिंधी समाज निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला नसता. असेही बोलले जात आहे.