ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये १२ जानेवारी, २०२४ पर्यंत आणखी ४८ हजार ६३१ मतदारांची वाढ झाली आहे. त्यानुसार आता एकूण मतदारांची संख्या ६३ लाख ९२ हजार ५२० मतदारांची नोंद झाली आहे. यात पुरूष मतदारांची संख्या ३४ लाख ४९ हजार ४९०, स्त्री मतदारांची संख्या २९ लाख ४१ हजार ६४२, इतर मतदारांची संख्या १ हजार २२८ एवढी नोंद झाली आहे. त्यातही मतदार नोंदणीमध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदारांच्या संख्येत ३९ हजार ५९० मतदारांची भर पडली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ च्या प्रारुप मतदार यादीत १ लाख ७७ हजार ०७८ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच १ लाख २८ हजार ४४७ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीत ४८ हजार ६३१ मतदारांची निव्वळ वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. तर जिल्ह्यात प्रथमच आदिवासी, भटके विमुक्तांची देखील मतदार नोंदणी करण्यात आली आहे. त्यात २७ हजार ४६३ आदीवासी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
अंतिम मतदार प्रसिध्द होत असतांना १८ हजार ७८५ पुरुष मतदारांची आणि ३१ हजार ७१५ स्त्री मतदारांची व १३१ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ ढागी आहे. त्यामुळे महिलांच्या नोंदणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री पुरुष गुणोत्तर ८४८ वरुन ८५३ इतके झाले आहे. तर पुर्नरिक्षण कार्यक्रमात १८ ते १९ वयोगटातील ३९ हजार ५९० मतदारांची नव्याने भर पडली आहे. तसेच २० ते २९ वयोगटात ४३ हजार ८८९ मतदारांची वाढ झाली आहे. प्रारुप मतदार यादीत १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ३० हजार १३० (०.३१ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत ६९ हजार ७२० (१.०९ टक्के) इतकी झाली. तर २० ते २९ वयोगटातील प्रारुप यादीतील मतदार संख्या ९ लाख ७९ हजार १५३ (१०.०४ टक्के) होती, ती अंतिम यादीत १० लाख २३ हजार ४२ (१६ टक्के) इतकी झाली आहे.
या सर्व्हेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही देखील करण्यात आली आहे. त्यानुसार ४७ हजार ७०९ मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. पैकी ८० पेक्षा अधिक वय असलेले १८ हजार ८१३ मतदार मृत किंवा वयात सुधारणा असलेल्यांची नावेही वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मतदार यांद्यामध्ये १ लाख ५० हजार छायाचित्र समान नोंदी असल्याचे निर्दशनास आले. त्यांची सखोल तपासणी करुन विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कालावधीत ४८ हजार ३५४ मतदारांची नावेही वगळण्यात आली. तर इतर काही तपशील समान असलेले लोकसंख्या शास्त्रीयदृष्टया समान नोंदी २७ हजार ०९३ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करुन ९ हजार १९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे कार्यालयामार्फत मतदार राजा जागा हो मतदानासाठी सज्ज हो हे अभियान राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भटके विमुक्त आणि आदीवासी देखील बजावणार मतदानाचा हक्क
या पुर्नरिक्षण कार्यक्रमात भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेण्यात आली. त्यात मतदार नोंदणी बरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीमधील लोकांना वाटप करण्यात आले. त्यानुसार भटक्या व विमुक्त जमातीच्या ३८४ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात कातकरी हे विशेष असुरक्षित आदीवासी समुह आहेत. यंदाच्या अंतिम मतदार यादीत या समुहातील २७ हजार ४६३ मतदारांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यात ६ हजार ५२४ मतदान केंद्र
मतदारांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करता यावे या उद्देशाने निवडणुक विभागाने जिल्ह्यात ६५२४ मतदान केंद्र सज्ज केली आहेत. त्यातील मुरबाड मध्ये सर्वात मोठे मतदान केंद्र असून त्याची संख्या ५११ आहे. तर सर्वात कमी मतदान केंद्राची संख्या उल्हासनगरमध्ये असून ती २११ एवढी आहे. त्यातही एकही मतदान केंद्र हे पहिल्या किंवा दुसºया मजल्यावर असणार नसून सर्व केंद्र ही तळमजल्यावर असल्याचेही शिणगारे यांनी स्पष्ट केले. यापुढेही जाऊन सुशिक्षित मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी आता मोठ मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणीच मतदान केंद्राची निर्मिती केली जाणार असून त्याची संख्या ३४ एवढी आहे. तर ८० वयोगटापुढे असलेल्या वृध्द नागरीकांना जे आजारी असतील, अंथरुलणाला खिळून असतील अशा नागरीकांनी मतदान करायचे आहे असे सांगितल्यास त्यांची घरी जाऊन मतदान करुन घेतले जाणार आहे.