ठाणे : आतापर्यंत भारतात १७ पैकी ९ वेळा ६० किंवा त्यापेक्षा अधिक मतदान झालेले आहे. ६० आणि त्यापेक्षा जास्त मतदान झाले त्या त्यावेळी बदल घडला आहे. २०१९ साली ६७ टक्क्यांच्यावर मतदान झाले होते. १९५२ ते २०१९ या कालावधीत मतदानाचे प्रमाण वाढले. जेव्हा मतदार मतदानासाठी जास्त प्रमाणात बाहेर पडतात तेव्हा उत्साह जास्त वाढतो. कदाचित लोकसभेच्या निवडणूकीत मतदानाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी मत व्यक्त केले.
इंद्रधनु आयोजित "बदलता भारत" मालिकेतील "निवडणुका"या विषयावरील पुष्प शनिवारी सहयोग मंदिर सभागृहात गुंफले गेले. या चर्चासत्रात डॉ. सहस्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांच्याशी पत्रकार भारती सहस्रबुद्धे यांनी संवाद साधला. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, सगळ्यात कमी मतदान म्हणजेच ४४ टक्के मतदान १९५२ च्या काळात झाले होते. आजपर्यंत सगळ्यात कमी झालेले ते मतदान होते. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढतच गेला. ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे म्हणाले की, मतदानाची संरचना गेल्या १५ ते २० वर्षांत प्रेसिडेन्शीयल मतदानाप्रमाणे केली आहे आणि हे माध्यमांनी केलेले पाप आहे. आपली द्विपक्षी लोकशाही नाही. माध्यमे समाजात आपल्या निवडणूकीतील मतदानाची रचना ही अमेरिकेतील मतदानाप्रमाणे प्रेक्षकांसमोर आणत आहेत. अशामुळे आपण मतदानापासून दूर जात आहोत. सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, नोटा हा पर्याय दिला ती चांगली गोष्ट आहे. पण नोटाची मते जर पहिल्या क्रमांकावर आली तर त्या भागातील निवडणूक बंद करावी किंवा त्या उमेदरावाला परत निवडणूकीत उभे राहण्यापासून रोखावे. मतदानाचा टक्का वाढतोय म्हणजे मतदार मतदानाविषयी गंभीर आहेत. ईव्हीएमवर विश्वास म्हणून मतदार मतदानासाठी येतात. हरल्यावर इव्हीएमवर अविश्वास दाखवायचा आणि जिंकल्यावर त्याविषयी काही बोलायचे नाही असे वातावरण असल्याने इव्हीएमवरील अविश्वासाला गांभीर्याने घेतले जात नाहीत.