जितेंद्र कालेकरठाणे : कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा या मतदारसंघांतील अनेक मतदानकेंद्रांमध्ये मतदारांच्या नावांतील घोळ आणि मतदानयंत्रांतील बिघाडामुळे मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, दिव्यांग मतदारांसाठी तळमजल्यावर मतदानकेंद्र असल्यामुळे या मतदारांनी समाधान व्यक्त केले.कोपरीतील वनविभागाच्या वसाहतीमध्ये ३६३ ते ३६५ ही तीन मतदानकेंद्रे होती. याठिकाणी करण भोईर या मतदाराचे नाव ३६३ मध्ये अपेक्षित असूनही ते ३५२ मध्ये आल्यामुळे त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी ११ ते १२ या दरम्यान या दोन्ही ठिकाणी आपले नाव शोधण्यातच त्यांना बराच वेळ खर्च करावा लागला. ३६३ मध्येच स्वाती सावे या शिक्षिकेचे नाव स्वाती साबे असे मतदारयादीत प्रसिद्ध झाले होते. अनेकांनी निवडणूक आयोगाच्या आवाहनानंतर मतदारांच्या पुनर्नोंदणीत नावाचा समावेश करूनही त्यांचे नाव मतदारयादीत आले नसल्याचे कोपरीतील शिवसेना कार्यकर्त्या नीलम भोईर यांनी सांगितले. याच परिसरातील अनंत नागेश नार्वेकर यांच्या मुलाचे नावही सचिन अनंत गलगले (४५) असे मतदारयादीत आले. नार्वेकर हे कोपरीतील विजयनगर येथे वास्तव्याला असून त्यांनाही मतदानासाठी अनेक पुराव्यांची जमवाजमव करताना दमछाक झाली. नाशिक येथून ठाण्यातील मतदारयादीत नाव नोंदविलेल्या मुकुंद खुटे यांनाही ब-याच परिश्रमानंतर आपले नाव मिळाले. त्यानंतर, त्यांनी वनविभागाच्या मतदानकेंद्रावर मतदान केले.*ब्राह्मण विद्यालयात तांत्रिक बिघाडओवळा-माजिवडा मतदारसंघातील वर्तकनगर येथील ब्राह्मण विद्यालयातील मतदानकेंद्र क्रमांक ३६३ येथील मतदानयंत्रामध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बिघाड झाला होता. त्यामुळे भीमा राठोड यांच्यासह १० ते १५ जणांना, तर ३५८ क्रमांकाच्या मतदानकेंद्रावर पोपट सोनवणे यांच्यासह २० ते २५ जणांना अर्धा ते एक तास ताटकळत उभे राहावे लागले. सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने याठिकाणी ईव्हीएमयंत्र बदलण्यात आले. त्यानंतर मतदानप्रक्रिया सुरळीत झाली. एकाच ठिकाणी दोन ते तीन वेळा मतदानयंत्रांत बिघाड झाल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विमल भोईर आणि मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष संतोष निकम, प्रसाद भांदीगरे यांनी मतदानकेंद्र अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेकांनी या केंद्रावर वेळ वाढवून देण्याचीही मागणी केली. ही मागणी मान्य केल्यानंतर याठिकाणचे वातावरण निवळले................
*दिव्यांगांनी व्यक्त केले समाधानवर्तकनगर येथील थिराणी विद्यामंदिरमध्ये खुशाल इंगळे यांच्यासह अनेक दिव्यांगांचे तळमजल्यावरील मतदानकेंद्रांमध्ये नाव होते. अगदी सहज मतदान करता आल्यामुळे इंगळे यांच्यासह वयोवृद्ध मतदारांनीही निवडणूक यंत्रणेबद्दल समाधान व्यक्त केले.
* ठाणे पूर्वेतील कोपरी गावातील १०८ वर्षीय विठाबाई दामोदर पाटील या आजीबार्इंनीही गावातीलच शाळा क्रमांक १६ या मतदानकेंद्रावर सोमवारी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेकदा कोणतेही कारण नसताना तरुण मतदार मात्र मतदानामुळे काय होणार आहे, अशी लंगडी सबब पुढे करून मतदानापासून चार हात लांब राहतात. अशा नवमतदारांसमोर या १०८ वर्षीय विठाबार्इंनी मात्र एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.-------------------*स्वच्छतागृहाचीही असुविधाओवळा-माजिवडा मतदारसंघातील लोकमान्यनगरपाडा क्रमांक-३, परेरानगर येथील द्रौपदीबाई इंदिसे शाळेतील मतदानकेंद्रावर स्वच्छतागृहाचीही सुविधा नसल्याने त्याठिकाणी असलेल्या महिला अधिकारी, कर्मचारी यांनी मतदानकेंद्राध्यक्षांकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे सखी मतदानकेंद्रांची संकल्पना राबविण्यात येत असताना, अशा गैरसोयींमुळे महिला कर्मचाºयांची कुचंबणा होते. या बाबींकडेही निवडणूक यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची तक्रार येथील महिला कर्मचाºयांनी सोमवारी पहाटे ५.३० वाजताच केली. त्यामुळे मतदान सुरू होण्यापूर्वीच आपल्याच कर्मचाºयांची समजूत काढण्याची वेळ येथील अधिकाºयांवर आली होती.-----------------* टक्का कमी झाल्यामुळे लता शिंदेंनीही केली विचारपूसकोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये सकाळी ७ ते ९ या दोन तासांमध्ये अवघे सहा टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ ११ पर्यंत १७, तर दुपारी ३ पर्यंत २७ टक्के मतदान झाल्यामुळे पालकमंत्री तथा शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे याही तणावात होत्या. कुठे दगाफटका तर झाला नाही ना? अशी विचारणा त्यांनी कोपरीतील आपल्या महिला कार्यकर्त्यांकडे केली. मात्र, आपण कुठेही कमी पडलो नसल्याचा दिलासा येथील अनेक महिलांनी त्यांना दिल्यानंतर त्यांचा तणाव कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोपरीतील अनेक भागांत दुपारी ३ वा.नंतर फिरून त्यांनी मतदानकेंद्रांवर पाहणीही केली. कमी मतदानाचा तणाव जसा विरोधकांवर होता, तसा तो सत्ताधारी आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या चेह-यावरही जाणवला.